वाहतुकीची गर्दी कमी करण्यासाठी बांधला सब-वे, आता त्याचाच झाला तरण तलाव
By राजेश शेगोकार | Published: April 13, 2023 12:04 PM2023-04-13T12:04:12+5:302023-04-13T12:04:58+5:30
अंडरपास मधून ये-जा करणाऱ्या दुचाकींच्या इंजिनमध्ये पाणी भरून वाहनांमध्ये बिघाड
राजेश शेगाेकार, अकोला: शहरातील मध्यवर्ती बसस्थानक समोरच्या चौकातील वाहतुकीची गर्दी कमी व्हावी, या उद्देशाने बांधण्यात आलेल्या अंडरपासची वर्षभरातच वाट लागली आहे. गत काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे या अंडरपासमध्ये पाणी भरले आहे. त्यामुळे या अंडरपास मधून ये-जा करणाऱ्या दुचाकींच्या इंजिनमध्ये पाणी भरत असल्याने वाहन खराब होत असल्याचे दिसून येते तर दूसरीकडे या पाण्यामध्ये अनेक लहान मुले पाेहण्याचा आंनद घेतांना दिसत आहेत. गेल्या दाेन दिवसांपासून या अंडरपास मधील पाणी कायमच आहे.
गांधी रोड ते जनता भाजी बाजार पर्यंत जवळपास ३०० मीटर लांबीचा अंडरपास बांधण्यात आला आहे. गतवर्षी उड्डाणपुलासोबतच अंडरपासचेही लोकार्पण करण्यात आले. नव्याची नवलाई म्हणून अकोलेकरांनी या अंडरपास मधून येण्या-जाण्याची हौस भागवून घेतली. आता मात्र या अंडरपासची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. गत काही दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे या अंडरपासमध्ये पूर्ण पाणी भरले आहे. या पाण्यातूनही अनेक हवसे दुचाकी घेऊन जात आहे. तर काही युवक या पाण्यामध्ये चक्क आंघोळ करीत असल्याचे दिसून येत आहे.