११० रुपयांत गणवेश शिवून देणाऱ्याच्या शोधात शिक्षक? विद्यार्थ्यांना पूर्ण गणवेशच देण्याची पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी
By नितिन गव्हाळे | Published: June 17, 2024 10:41 PM2024-06-17T22:41:12+5:302024-06-17T22:41:30+5:30
अकोला: शालेय विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेश योजनेबाबतशिक्षक व पालकांनी केलेल्या सुचनांचा विचार करून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्ण गणवेशच मिळावा अथवा ...
अकोला: शालेय विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेश योजनेबाबतशिक्षक व पालकांनी केलेल्या सुचनांचा विचार करून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्ण गणवेशच मिळावा अथवा शिलाई अनूदान वाढवून मिळावे अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सन २०२४-२५ मध्ये सर्व विद्यार्थ्यांना गणवेश कापड वाटपाचे आदेश आहेत. त्यामुळे गणवेश शिलाई आता स्थानिक स्तरावरून करावी लागणार आहे. याबाबत राज्यातील शिक्षक व पालकांनी संघटनेकडे काही सुचना मांडल्या आहेत. त्या पुढील सूचनांचे निवेदन संघटनेने शिक्षण मंत्री, शिक्षण आयुक्त, राज्य प्रकल्प समन्वयक तथा सहसंचालक (प्रशासन) प्राथमिक शिक्षण परिषद पुणे यांना ई-मेल द्वारे पाठविण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना सत्रारंभी दोन्ही पूर्ण तयारच गणवेश शासनाकडून मिळावेत. एक राज्य एक गणवेश योजनेअंतर्गत राज्यस्तरावरून एका गणवेशासाठी कापड देण्याचे नियोजन आहे व स्थानिक स्तरावर शाळा समितीने गणवेश शिलाई करून द्यावी असे दि. १८ ऑक्टोंबर २०२३ व ५ जून २०२४ च्या शासननिर्णयाने आदेशित करण्यात आले आहे.
११० रूपयांमध्ये बचतगटसुद्धा शिलाईस इच्छुक नाहीत!
शासनाने शिलाईसाठी दिलेली ११० रूपये ही रक्कम अत्यंत कमी असल्याने स्थानिक बचत गट शालेय गणवेश शिलाई करून देण्यास तयार नाहीत. त्यामुळे शासनाच्या वतीने फक्त गणवेश कापड न पुरवता रेडिमेड गणवेशाचा पुरवठा करावा, अथवा शिलाईसाठी रक्कम वाढवून द्यावी. अशी मागणी राज्य नेते विजय भोगेकर, शारदा वाडकर,राज्य प्रतिनिधी प्रशांत शेवतकर, जिल्हा नेते प्रशांत भारसाकळे, जिल्हाध्यक्ष संघर्ष सावरकर, कार्याध्यक्ष अनिल ठाकरे, कोषाध्यक्ष विजय वाकोडे, उपाध्यक्ष प्रविण डेरे, मो.अनवर, महीला जिल्हाध्यक्षा हेमलता चव्हाण, सरचिटणीस स्वप्नाली शेळके यांनी निवेदनातून केली आहे .