अनैतिक संबधाच्या संशयातून युवकास भोसकले; आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल, युवक गंभीर जखमी
By नितिन गव्हाळे | Published: August 9, 2023 06:22 PM2023-08-09T18:22:40+5:302023-08-09T18:22:52+5:30
आपल्या पत्नीशी शेजारी राहणाऱ्या आपल्याच मित्राचे अनैतिक संबध असल्याचे खुळ एका विवाहित युवकाच्या डोक्यात शिरले.
अकोला : आपल्या पत्नीशी शेजारी राहणाऱ्या आपल्याच मित्राचे अनैतिक संबध असल्याचे खुळ एका विवाहित युवकाच्या डोक्यात शिरले. त्याने संबधित युवकाला घरी बोलावून, त्याच्या पोटात चाकू भोसकून त्यास गंभीर जखमी केले. या प्रकरणात अकोट फैल पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अकोट फैलातील २३ वर्षीय विवाहित युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या शेजारी त्याचा एक मित्र राहतो. तोसुद्धा विवाहित आहे. परंतु काही दिवसांपासून मित्र असलेला हा युवक त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचे माझ्यासोबत अनैतिक संबध असल्याचा संशय घेत आहेत.
६ ऑगस्ट रोजी रात्रीदरम्यान या युवकाने फोन करून मला घरी बोलावून पत्नीशी अनैतिक संबध असल्याचा आरोप केला. त्यावर त्याला समजावून सांगितले की, तुला काही गैरसमज झालेला असून, तुझ्या पत्नीसोबत माझे कोणतेही संबध नाहीत. त्यानंतर मी घराबाहेर आल्यावर आरोपी युवकाने धारदार चाकू पोटात भोसकला. यात मी गंभीर जखमी झाल्याने, तातडीने सर्वोपचार रूग्णालयात नातेवाइकांनी दाखल केले. याठिकाणी उपचारादरम्यान अकोट फैल पोलिसांनी जबाब नोंदविला. त्यानुसार पोलिसांनी आरोपी युवकाविरूद्ध भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला.