मुलीचा विनयभंग करणाऱ्या युवकास पाच वर्षांचा कारावास, एक लाख रूपये दंडही ठोठावला
By नितिन गव्हाळे | Published: September 20, 2022 06:25 PM2022-09-20T18:25:28+5:302022-09-20T18:26:32+5:30
मुलीचा विनयभंग करणाऱ्या युवकास पाच वर्षांचा कारावास ठोठावला आहे.
अकोला : घराजवळील किराणा दुकानामध्ये रात्रीच्या सुमारास १० वर्षीय मुलगी गेली असता, तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन करून विनयभंग करणारा आरोपी संजय उर्फ माकोडा हरिदास मेसरे (२८) रा. भोईपुरा, पोळा चौक जुने शहर अकोला याला अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने पाच वर्षांचा सक्त कारावास आणि १ लाख रूपये दंड सुनावला आहे.
मुलीच्या आईने जुने शहर पोलीस ठाण्यात २० मे २०२१ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार तिची १० वर्षीय मुलीला परिसरातील किराणा दुकानामध्ये पाठविले असता, आरोपी संजय उर्फ माकोडा मेसरे याने मुलीसोबत अश्लील वर्तन करून विनयभंग केला. ही बाब मुलीने तिच्या आईला सांगितली. याप्रकरणात जुने शहर पोलिसांनी आरोपी संजय मेसरे याच्याविरूद्ध भादंवि कलम ३५४ (ड) (१), ५०९, पोस्को नुसार गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी आरोपीस अटक करून त्याच्याविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. एपीआय संगीता रंधे यांनी याप्रकरणाचा तपास केला. सरकार पक्षाने याप्रकरणात एकूण ५ साक्षीदार तपासले. साक्ष, पुरावे ग्राह्य मानुन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले. न्यायालयाने आरोपीस कलम ३५४ (ए), ३५४(ड), ५०९ नुसार प्रत्येकी ३ वर्ष सक्त कारावास, प्रत्येकी २० हजार रूपये दंड, न भरल्यास प्रत्येकी सहा महिने कारावास, पोस्को ॲक्टनुसार ५ वर्ष सक्त कारावास, २० हजार रूपये दंड, न भरल्यास सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली.
दरम्यान, या सर्व शिक्षा आरोपीला एकत्रित भोगावयाच्या आहेत. सरकारच्यावतीने सहाय्यक सरकारी विधीज्ज्ञ किरण खोत यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून वैशाली कुवलकर, सीएमएस सेल अधिकारी पीएसआय प्रविण पाटील यांनी काम पाहिले.