दोन हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 09:27 AM2021-06-30T09:27:58+5:302021-06-30T09:28:13+5:30
Akola News : जिल्ह्यात २ हजार ५३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्यापही बाकी आहे.
अकोला : दोन लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणाऱ्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. जिल्ह्यात २ हजार ५३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्यापही बाकी आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना लाभ मिळणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक, अनैसर्गिक संकटांमुळे आर्थिक स्थिती बिकट झालेल्या शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्तीची घोषणा करून मोठा दिलासा दिला. अल्पावधीतच घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तयार करून शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्तीसुद्धा जाहीर केली. त्यानंतर प्रक्रिया गतीने राबवून जिल्हानिहाय पात्र शेतकऱ्यांच्या खात्याचे अपलोडिंग करण्यात आले व विनाअवकाश कर्जमुक्तीसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या जाहीर सुद्धा करण्यात आल्या; परंतु कर्जमुक्तीचा प्रत्यक्ष लाभ मिळविण्यासाठी पात्रता यादीतील शेतकऱ्यांना त्यांचे आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे असल्याचे योजनेच्या अटींमध्ये नमूद आहे.
महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत सहकार विभागाने जिल्हा सहकारी बँक व अन्य खासगी-सार्वजनिक बँकांच्या मदतीने १ लाख १४ हजार ७४३ शेतकऱ्यांची नावे सरकारने या कर्जमाफी योजनेसाठी तयार केलेल्या स्वतंत्र संकेतस्थळावर अपलोड केली होती. त्यातील १ लाख ४ हजार ३६९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांचे आधार प्रमाणीकरणही करण्यात आले आहे. उर्वरित २ हजार ५३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी राहिले आहे.
मृत शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण कसे होणार?
या याद्यांमधील हजारो शेतकरी हयात नसल्याने त्यांचे आधार प्रमाणीकरण करायचे कसे, ही मोठी समस्या निर्माण झाली आहे.