अकोला, अकोट, मूर्तीजापूर शहरातील आधार नोंदणी केंद्र बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:22 AM2021-02-25T04:22:58+5:302021-02-25T04:22:58+5:30
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यातील अकोला, अकोट, मूर्तिजापूर शहरातील आधार नोंदणी केंद्र बंद ठेवण्यात येत ...
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यातील अकोला, अकोट, मूर्तिजापूर शहरातील आधार नोंदणी केंद्र बंद ठेवण्यात येत असल्याचा आदेश प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी ) मुकेश चव्हाण यांनी बुधवारी दिला.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील अकोला, अकोट व मूर्तिजापूर शहराचे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून (कंटेन्मेंट झोन) घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार अकोला, अकोट, मूर्तिजापूर शहर कंटेनमेंट झोन घोषित असेपर्यंत या तिन्ही शहरांत आधार नोंदणी केंद्र बंद ठेवण्यात येत असल्याचा आदेश प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिला.
...तर आधार नोंदणी
किट जप्त करणार!
आधार नोंदणी केंद्र सुरू असल्याचे आढळून आल्यास आधार नोंदणी किट जप्त करून कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.