राकाँच्या महिला कार्यालयात आधार नाेंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:19 AM2021-02-16T04:19:38+5:302021-02-16T04:19:38+5:30
सभापतींकडून एसटीपीची पाहणी अकाेला : महापालिकेचे स्थायी समिती सभापती सतीश ढगे यांनी डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात उभारल्या जाणाऱ्या ...
सभापतींकडून एसटीपीची पाहणी
अकाेला : महापालिकेचे स्थायी समिती सभापती सतीश ढगे यांनी डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात उभारल्या जाणाऱ्या सात एमएलडी प्लान्टची पाहणी केली. यावेळी सभापती ढगे यांनी प्रकल्पाची माहिती घेऊन संभाव्य अडचणीबद्दल विचारणा केली. यावेळी मनपाच्या जलप्रदाय विभागातील अभियंते व कर्मचारी उपस्थित हाेते.
पथदिव्यांसाठी सभापतींचे पत्र
अकाेला : प्रभाग क्रमांक १५ मधील विविध भागात नागरी दलित वस्ती सुधार याेजनेंतर्गत पाेल उभारण्यात आले आहेत. परंतु या पाेलवर अद्यापही एलईडी पथदिवे न लावल्यामुळे स्थानिक रहिवाशांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या भागात ज्या पाेलवर पथदिवे नाहीत, त्यावर तातडीने लाईट लावण्याची मागणी मनपाच्या महिला व बालकल्याण समिती सभापती मनीषा भन्साली यांनी पत्राद्वारे मनपा आयुक्तांकडे केली आहे.
मुख्य रस्त्यांची साफसफाई नाहीच
अकाेला : शहरातील काही बाेटावर माेजता येणारे मख्य मार्ग वगळल्यास इतर रस्त्यांच्या साफसफाईकडे महापालिकेच्या स्वच्छता व आराेग्य विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांलगत कचरा साचला असून प्लॅस्टिक पिशव्यांचा खच दिसून येत आहे. यामुळे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराकडे आयुक्त निमा अराेरा यांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
शाळेत विद्यार्थ्यांची ५० टक्के उपस्थिती
अकाेला : शासनाने इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरू केली असली तरी काेराेनाचा दिवसेंदिवस वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवल्याचे समाेर आले आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची ५० टक्के उपस्थिती दिसत आहे. पाल्यांना शाळेत पाठविण्यास पालक उत्सुक नसल्याचे बाेलल्या जात आहे.
शैक्षणिक सहलीत शाळांना भेटी
अकाेला : जिल्हा परिषद अंतर्गत अकाेला पंचायत समितीमधील आगर केंद्रातील शिक्षकांची शैक्षणिक सहल काढण्यात आली. या शिक्षकांनी जागतिक स्तरावर आपल्या कार्याची छाप टाकणारे शिक्षक रणजितसिंह डिसले हे कार्यरत असलेल्या जि.प.शाळा परितेवाडी, जि. साेलापूर येथे भेट देऊन पाहणी केली. तसेच विद्यार्थी व पालकांसाेबत संवाद साधला.
शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या
अकाेला : मालकीची दुचाकी, चारचाकी गाडी, शेतीचे वाढलेले उत्पन्न आदी नवीन निकष लावून असंख्य शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे गरीब जनतेवर अन्याय हाेणार असल्याने शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पाताेडे यांनी केली आहे.
बॅरिकेड बेवारस
अकाेला : जुने शहरातील एका महाविद्यालयात कार्यक्रमासाठी सरसंघचालक माेहन भागवत आले हाेते. त्यांच्या सुरक्षेसाठी पाेलिस प्रशासनाने प्रभाग क्रमांक १० मधील प्रत्येक गल्लीबाेळात बॅरिकेड लावले हाेते. सदर बॅरिकेड मागील अनेक दिवसांपासून रस्त्यांवर बेवारस असल्याचे समाेर आले आहे. या बॅरिकेडमुळे चाैकाचाैकात वाहतुकीला अडथळा निर्माण हाेत आहे.
प्रभाग १० मध्ये अतिक्रमण
अकाेला : जुने शहरातील प्रभाग क्रमांक १० अंतर्गत येणाऱ्या साेपीनाथ नगरमध्ये चिंतामणीनगर ते साेपीनाथ चाैकापर्यंतच्या मुख्य मार्गावरील स्थानिक रहिवाशांनी चक्क रस्त्याच्या जागेवरच अवैधरीत्या अनधिकृत बांधकाम करण्याचा सपाटा लावला आहे. रस्त्याच्या दाेन्ही बाजूंनी आवारभिंत उभारण्यात आल्यामुळे वाहनांची काेंडी हाेत आहे. शिवाय रस्त्यावरच वाहने उभी केली जात आहेत.