जिल्ह्यात ९ हजारांवर शेतकऱ्यांचे आधार सीडिंग अपूर्ण; PM किसान सन्मानच्या हप्त्याला मुकणार
By रवी दामोदर | Published: December 26, 2023 03:32 PM2023-12-26T15:32:49+5:302023-12-26T15:33:09+5:30
पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आता शेतकऱ्यांना १६ व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात १५ वा हप्ता जमा झाला होता
अकोला : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत १५ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. सध्या शेतकऱ्यांना १६ व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची ई-केवायसी, आधार सीडिंग अपूर्ण असल्यास त्या शेतकऱ्यांना पीएम किसानच्या हप्त्यापासून मुकावे लागणार आहे. जिल्ह्यात जवळपास ९ हजार ४१७ शेतकऱ्यांचे आधार सीडिंग अपूर्ण असल्याची माहिती आहे. कृषी विभागामार्फत जनजागृती करण्यात येत असून, शेतकऱ्यांनी आधार सीडिंग, ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ८९ हजार ६८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी तब्बल १ लाख ७९ हजार ५२१ शेतकऱ्यांचे आधार सीडिंग पूर्ण झाले आहे. अद्यापही ९ हजार ४१७ शेतकऱ्यांचे आधार सीडिंग अपूर्ण असल्याची माहिती आहे. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी, आधार सीडिंग व लॅण्ड सीडिंग अपूर्ण असल्यास त्या शेतकऱ्यांना ‘पीएम किसान’च्या हप्त्याला मुकावे लागणार आहे. यासाठी कृषी विभागामार्फत जनजागृती करण्यात येत आहे.
१६ वा हप्ता कधी मिळणार?
पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आता शेतकऱ्यांना १६ व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात १५ वा हप्ता जमा झाला होता. त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा सोळावा हप्ता चार महिन्यांनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. हा १६ वा हप्ता फेब्रुवारी ते मार्च महिन्यादरम्यान जारी होण्याची शक्यता आहे.
तालुकानिहाय अशी आहे आधार सीडिंग अपूर्ण असणाऱ्यांची संख्या
तालुका आधार सीडिंग अपूर्ण
अकोला - २,१८७
अकोट - १,४३८
बाळापूर - १,५८७
बार्शीटाकळी - १,०४१
मूर्तिजापूर - १,०६१
पातूर - १,०२०
तेल्हारा - १,०८३
------------------------------------------
एकूण - ९,४१७