केवळ ९८ आरोग्य संस्थांमध्ये आधार लिंक बायोमेट्रिक मशीन

By admin | Published: July 14, 2017 01:58 AM2017-07-14T01:58:49+5:302017-07-14T01:58:49+5:30

अकोला आरोग्य सेवा परिमंडळ : बहुतांश केंद्रांमध्ये बायोमेट्रिकला खो!

Aadhar link biometric machine in only 98 health institutes | केवळ ९८ आरोग्य संस्थांमध्ये आधार लिंक बायोमेट्रिक मशीन

केवळ ९८ आरोग्य संस्थांमध्ये आधार लिंक बायोमेट्रिक मशीन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : आरोग्य विभागातील सर्व शासकीय रुग्णालये, कार्यालयांमध्ये आधार लिंक बायोमेट्रिक मशीन बसविण्याचे शासनाचे निर्देश असले, तरी सद्यस्थितीत अनेक आरोग्यसंस्थांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित झालेली नाही. अकोला आरोग्य सेवा परिमंडळातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा व अमरावती या पाच जिल्ह्यांमधील केवळ ९८ आरोग्य संस्थांमध्येच आधार लिंक बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आलेल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्र शासनाच्या धोरणानुसार आधार लिंक बायोमेट्रिक प्रणालीची अंमलबजावणी करण्याचे शासनाने निश्चित केले असून, त्यानुसार आरोग्य विभागातील सर्व शासकीय रुग्णालये, कार्यालयांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित करण्याबाबतचा निर्णय गतवर्षी घेण्यात आलेला आहे. त्यानुसार राज्यातील ५९,२८९ अधिकारी/कर्मचाऱ्यांनी यासाठी नोंदणी केली असून, त्यापैकी १६,५४८ अधिकारी/कर्मचाऱ्यांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन आता आधार लिंक प्रणालीद्वारे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहेत.
याबाबतचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून सर्व संस्थांमध्ये १५ आॅगस्टपर्यंत आधार लिंक बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करण्याच्या सूचना शासन स्तरावरून जारी करण्यात आल्या आहेत. अकोला आरोग्य सेवा परिमंडळातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ या पाच जिल्ह्यांमधील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आलेल्या आहेत. यापैकी ९८ मशीन या आधार लिंक असून, उर्वरित मशीन साध्या असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

मुख्यमंत्री कार्यालयाने मागविली माहिती
राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये किती आधार लिंक बायोमेट्रिक मशीन कार्यान्वित आहेत, याबाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून मागविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आरोग्य सेवा, मुंबई कार्यालयाचे सहसंचालक इंद्रजित गोरे यांनी राज्यातील सर्व आरोग्य मंडळांच्या उपसंचालकांना पत्र पाठवून त्यांच्या अखत्यारित येत असलेल्या आरोग्य संस्थांमधील बायोमेट्रिक प्रणालीची माहिती मागविली आहे.

राज्यात ३३७ बायोमेट्रिक मशीन
राज्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये ३३७ आधार लिंक बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आल्या असून, सध्या केवळ ३,४०० ते ३,६०० कर्मचारी या सुविधेचा वापर करीत आहेत. अजूनही मोठ्या प्रमाणातील कर्मचारी आधार लिंक बायोमेट्रिक प्रणालीच्या कक्षेत आलेले नाहीत.

Web Title: Aadhar link biometric machine in only 98 health institutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.