आजी-माजी उपाध्यक्षांना पोलीस कोठडी
By admin | Published: January 4, 2016 02:46 AM2016-01-04T02:46:26+5:302016-01-04T02:46:26+5:30
खामगाव नगर पालिका इमारत गैरव्यवहार प्रकरण .
खामगाव : पालिकेतील एका गैरव्यवहार प्रकरणात खामगाव शहर पोलिसांनी पालिका उपाध्यक्ष वैभव डवरे व माजी उपाध्यक्ष सय्यद गणी सय्यद महम्मद यांना दोन जानेवारीला रात्री उशिरा ताब्यात घेतले होते. या दोघांना ३ जानेवारी रोजी न्यायालयात हजर केले असता या दोघांनाही ८ जानेवारीपर्यंंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पालिकेच्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी आर्किटेक्ट नियुक्तीमध्ये अपहार झाल्याचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. या प्रकरणात पोलिस सध्या प्रकरणाशी संबंधीत व्यक्ती व आरोपींची चौकशी करीत आहेत. त्यासदंर्भातच खामगाव शहर पोलिसांनी शनिवारी दोन जानेवारीला खामगाव पालिकेचे विद्यमान उपाध्यक्ष वैभव डवरे आणि माजी उपाध्यक्ष सय्यद गणी सय्यद महम्मद यांना रात्री उशिरा त्यांच्या घरून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार २ जानेवारी रोजी रात्री उशीरा नगरसेवक वैभव डवरे व माजी नगर उपाध्यक्ष सै.गनी सै.महंमद यांच्याविरुध्द कलम ४0३ मालमत्तेचा अप्रमाणिकपणे अपहार करणे, ४0६ अन्यायाने विश्वासघात करणे, ४0८/४0९ सरकारी नोकराने केलेला फौजदारी पात्र विश्वासघात, ४१७ फसवणुक करणे, ४१८ हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी फसवणूक करणे, ४६५ खोटे व बनावट दस्तावेज तयार करणे, ४६६ न्यायालयीन अभिलेख किंवा सार्वजनिक नोंद पुस्तक इत्यादीचे बनावटीकरण करणे, ४६८ फसवणूक करण्यासाठी बनावटीकरण व ३४ संगनमत करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ाविद्यमान पालिका उपाध्यक्ष वैभव डवरे व पालिका माजी उपाध्यक्ष सय्यद गणी सय्यद महम्मद या या दोघांचा आरोपी म्हणून समावेश केल्याने आता या अपहार प्रकरणात एकूण आरोपींची संख्या ९ झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार डी. डी. ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप गाढे करीत आहेत.