अकोला जिल्ह्यात दोन लाखावर कुटुंबांना मिळणार ‘आयुष्यमान’चे ‘कवच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 04:08 PM2018-10-10T16:08:23+5:302018-10-10T16:08:28+5:30
अकोला: आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यातील २ लाख ११ हजार ८८४ गरीब कुटुंबांना या योजनेचे ‘कवच’ मिळणार आहे.
- संतोष येलकर
अकोला: आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यातील २ लाख ११ हजार ८८४ गरीब कुटुंबांना या योजनेचे ‘कवच’ मिळणार आहे. संबंधित लाभार्थी कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध होणार आहेत.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची गत २३ सप्टेंबरपासून जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत विविध १ हजार ३०० आजारांचा समावेश असून, योजनेत पात्र लाभार्थी रुग्णांना पाच लाख रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे उपचार नि:शुल्क उपलब्ध होणार आहेत. सन २०११ च्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागातील २ लाख ११ हजार ८८४ गरीब कुटुंबांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेत पात्र ठरलेल्या संबंधित कुटुंबातील रुग्णांना विविध गंभीर स्वरूपाच्या आजारांवर मोफत उपचाराच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
योजनेत पात्र शहरी-ग्रामीण भागातील असे आहेत कुटुंब!
तालुका शहर ग्रामीण
अकोला ३२,०२३ ३३,८५६
अकोट ८,१९९ २३,९४०
बाळापूर ४,३८५ २०,५९७
पातूर २,१३९ १७,९३७
तेल्हारा १,७२५ २२,०६६
मूर्तिजापूर ३,०१३ १९,७९०
बार्शिटाकळी ...... २२,२१४
............................................................
एकूण ५१,४८४ १,६०,४००
दोन शासकीय रुग्णालयात सुविधा उपलब्ध!
आयुष्यमान भारत योजना अंमलबजावणीच्या प्रारंभी जिल्ह्यात सध्या लाभार्थी रुग्णांचे अर्ज स्वीकारणे व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालय या दोन शासकीय रुग्णालयांत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सन २०११ च्या सामाजिक आर्थिक सर्वेक्षणानुसार आयुष्यमान भारत योजनेंतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात २ लाख ११ हजार ८८४ कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेंतर्गत लाभार्थींना सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालय या दोन शासकीय रुग्णालयांमार्फत लाभार्थी रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
-डॉ. अश्विनी खडसे, जिल्हा समन्वयक, आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना