अल्पवयीन मुलीला पळवून लैंगिक शोषण; आरोपीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2022 09:08 PM2022-05-12T21:08:46+5:302022-05-12T21:08:55+5:30
Abducting and sexually abusing a minor girl : अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने गुरुवारी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
अकोला : अल्पवयीन मुलीला शाळेतून पळवून आरोपी युवकाने गुजरात गाठले. याठिकाणी सहा महिने राहिले. दरम्यान त्याने मुलीचे सातत्याने लैंगिक शोषण केले. या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने गुरुवारी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
पीडित मुलीच्या आजीने ४ ऑक्टोबर २०१६ रोजी अकोट फैल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तिची नात ही शाळेत गेली होती. सायंकाळ झाल्यानंतरही नात घरी परतली नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नाेंदविण्यात आली. सहा महिन्यांनी अल्पवयीन मुलगी व आरोपी सागर रमेश शंभरकर हे अकोट फैल पोलीस ठाण्यात हजर झाले. आरोपी सागर शंभरकर व मुलगी गुजरात येथे पती-पत्नीसारखे राहत होते. आराेपी सागरने तिच्या पालकांच्या संमतीशिवाय मुलीला गुजरातला पळवून नेले आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणात अकोट फैल पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६, ३७६(२), एन व पॉक्सोनुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात तपास पीएसआय छाया वाघ यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणात न्यायालयात
सरकारतर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता मंगला पांडे व किरण खोत यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कर्मचारी अरुण चव्हाण व सीएमएसचे एएसआय प्रवीण पाटील यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.
अशी ठाेठावली शिक्षा
न्यायालयाने भादंवि कलम ३६३ मध्ये आरोपीस ७ वर्षे कारावास, दहा हजार रुपये दंड, न भरल्यास ३ महिने अतिरिक्त शिक्षा, ३७६, ३७६(२)(एन) व पॉक्सो कायदा कलम ३-४-५ मध्ये दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली व विविध कलमांमध्ये चार लाखांचा दंड, न भरल्यास प्रत्येकी ६ महिन्यांची अतिरिक्त शिक्षा आरोपीस भोगावी लागेल. तसेच एकूण ४ लाख १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.