मुलीचे अपहरण करून शोषण; आरोपीस १० वर्षांचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 11:11 AM2022-06-09T11:11:11+5:302022-06-09T11:11:38+5:30
Abduction and exploitation of a girl : लग्नाचे आमिष दाखवून आणि मारण्याची धमकी देत, त्याने तिच्यासोबत शारीरिक संबध प्रस्थापित केले.
अकोला : अल्पवयीन मुलीचे बळजबरी अपहरण करून, तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. गोगरकर यांच्या न्यायालयाने बुधवारी आकाश देविदास इंगळे २६ रा.मालठाणा ता.तेल्हारा याला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
पीडित मुलीने ५ फेब्रुवारी, २०२० रोजी उरळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी आकाश देविदास इंगळे (२६) हा तिला २०१९ मध्ये लग्नाची मागणी घालण्यासाठी नातेवाइकांसह घरी आला होता, परंतु वडिलांनी मुलगी अल्पवयीन असल्याने, तिचे लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर, मुलगी ९ ऑक्टोबर, २०१९ रोजी मामाच्या घरी जाण्यासाठी निंबा फाटा येथे रिक्षाची वाट पाहत होती. या दरम्यान, आरोपी आकाश इंगळे हा तेथे आला आणि त्याने मुलीला जीवे मारण्याची धमकी देत, तिला पुणे येथे पळवून नेले. त्यानंतर, त्याने पुणे जिल्ह्यातील तुळजापूर येथे नेले, तसेच तिला लग्नाचे आमिष दाखवून आणि मारण्याची धमकी देत, त्याने तिच्यासोबत शारीरिक संबध प्रस्थापित केले. पुढे आरोपीने दोन ते तीन महिन्यांनी त्याच्या मामाच्या घरी नेले, नंतर त्याने मुलीला तिच्या घरी पाठवून दिले. आरोपीने या दरम्यान तिचे सातत्याने लैंगिक शोषण केले. मुलीच्या तक्रारीनुसार, उरळ पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३६३, ३७६ व पॉक्सोनुसार गुन्ह दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून, आरोपी आकाश इंगळेविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षाने ८ साक्षीदार तपासले. न्यायालयाने मुलीच्या शाळेतील मुख्याध्यापक व तिची वैद्यकीय तपासणी करणार्या डॉक्टरांचा व साक्षीदारांचा पुरावा ग्राह्य मानून आरोपी आकाश इंगळे याला १० वर्षे सश्रम कारावासासह १० हजार रुपये दंड, न भरल्यास ६ महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. पीडित मुलीच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्याम खोटरे यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून हेकाँ.ढोकणे, महिला पोलीस कर्मचारी सोनू आडे यांनी काम पाहिले.