अनियमितता प्रकरणात सचिवाला अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:18 AM2021-03-31T04:18:40+5:302021-03-31T04:18:40+5:30
खेट्री : पातूर तालुक्यातील सुकळी ग्रामपंचायतमध्ये १४व्या वित्त आयोगांतर्गत आलेल्या निधीचा गैरवापर केल्याबाबत तत्कालीन सचिव जी.एस. फसाले यांची ...
खेट्री : पातूर तालुक्यातील सुकळी ग्रामपंचायतमध्ये १४व्या वित्त आयोगांतर्गत आलेल्या निधीचा गैरवापर केल्याबाबत तत्कालीन सचिव जी.एस. फसाले यांची चाैकशी आटाेपण्याचा साेपस्कार केला जात असून, या प्रकरणात त्यांना अभय देण्यात येत असल्याचा आराेप तक्रारकर्त्यांनी केला आहे.
सुकळी येथील माजी सरपंच काशीराम सीताराम हिवराळे यांनी तत्कालीन सचिव जी. एस. फसाले व पातूरच्या तत्कालीन गटविकास अधिकारी यांना वारंवार माहिती अधिकारात माहिती मागितली; परंतु माहिती अधिकाराच्या अर्जाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे हिवराळे यांनी अमरावतीच्या आयुक्तांकडे अपील करून संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार केली. सदर तक्रारीवरून २०२०च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये पातूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आर.एस. गवई यांनी चौकशीसाठी वारंवार सुकळी ग्रामपंचायतला भेट दिली; परंतु चौकशीसाठी तत्कालीन सचिव जी.एस. फसाले यांना, अभिलेख सादर करण्यासाठी विस्तार अधिकारी यांनी वारंवार सूचना दिल्या; परंतु सचिवांनी अभिलेख सादर केले नाही, असे चौकशी अहवालामध्ये नमूद आहे.
१४व्या वित्त आयोगामध्ये मंजूर कृती आराखड्यानुसार कामे करण्यात आली नाही, त्यामुळे लाखो रुपयांचा भ्रष्टाचार तत्कालीन सचिव जी.एस. फसाले यांनी केल्याचा आरोप माजी सरपंच काशीराम सीताराम हिवराळे यांनी केला होता. या प्रकरणी पातूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आर.एस. गवई यांनी चौकशीदरम्यान १४व्या वित्त आयोगाचे निधीचे बँक स्टेटमेंट, १४व्या वित्त आयोगाचा मंजूर कृती आराखडा, अंदाजपत्रक, मोजमाप, नोंदवही, काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र व इतर सर्व अभिलेख मागितले होते. परंतु तत्कालीन सचिव जी.एस. फसाले यांनी चौकशीसाठी अभिलेख सादर केले नाही, असे अहवालानुसार समोर आले आहे. याबाबत विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
बॉक्स
पाच महिने उलटूनही सचिवावर कारवाई नाही
माजी सरपंच काशीराम सीताराम हिवराळे यांनी खातेनिहाय चौकशीसाठी तक्रार केली होती. सदर तक्रारीवर चौकशी करण्यात आली, तेव्हापासून पाच महिन्याचा कालावधी उलटला मात्र तत्कालीन सचिवावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.
काेट
चौकशीदरम्यान तसेच विस्तार अधिकाऱ्यांच्या वारंवार सांगण्यावरून तत्कालीन सचिव जी.एस. फसाले यांनी अभिलेख सादर केले नाही त्यामुळे निधीचा अपहार केल्याचे निष्पन्न होत आहे. पाच ते सहा महिन्याचा कालावधी उलटूनही तत्कालीन सचिवावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. सदर प्रकरण थंड बस्त्यात टाकून तत्कालीन सचिवाला अभय दिल्याचा प्रकार आहे.
काशीराम सीताराम हिवराळे, माजी सरपंच, सुकळी