बारावी परीक्षेला जिल्ह्यातून सुमारे २५ हजार विद्यार्थी
By नितिन गव्हाळे | Published: February 20, 2024 08:49 PM2024-02-20T20:49:22+5:302024-02-20T20:49:34+5:30
आजपासून बारावीची परीक्षा: परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त अभियान
अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (राज्य मंडळ) बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षेला २५ हजार ८७६ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा हा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा समजला जातो. विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र देण्यात आले आहेत.
नुकत्याचा बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा आटाेपल्या असून, बारावीची (सर्वसाधारण, द्विलक्ष्यी आणि व्यवसाय अभ्यासक्रम) परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत पार पडणार आहे. त्याचप्रमाणे, बारावीच्या माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा २० ते २३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. बारावीच्या परीक्षेला १३ हजार ७९३ मुले तर १२ हजार ५७ मुली बसणार असून, बारावीची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा २ ते २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत शांततेत पार पडली.
जिल्ह्यातील इयत्ता बारावीचे विद्यार्थी
शाखा मुले मुली एकूण
विज्ञान - ७७०९ ६६८५ १४३९४
कला - ४२६२ ४०३४ ८२९६
वाणिज्य - १०५३ १०६७ २१२०
व्होकेशनल - ७६९ २७१ १०४०
बारावीसाठी ८७ परीक्षा केंद्र
इयत्ता बारावीसाठी ८७ परीक्षा केंद्रे राहणार आहेत. इयत्ता दहावीच्या प्रत्येक परीक्षा केंद्रावर तीन शासकीय कर्मचाऱ्यांचे बैठे पथक राहणार असून, एकूण ७ भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. परीक्षा ‘कॉपीमुक्त’ करण्यासाठी नियोजन सुरू करण्यात आले आहे.
बारावी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी कॉपीचा प्रयत्न केल्यास, किंवा त्यांना कोणी सहकार्य केल्यास त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. कॉपीमुक्त अभियानावर भर राहणार असून, विद्यार्थ्यांनी खबरदारी घ्यावी.
- डॉ. सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी