सभेला गैरहजर अधिकाऱ्यांना बजावणार ‘शो काॅज’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:18 AM2021-04-17T04:18:11+5:302021-04-17T04:18:11+5:30
जिल्हा परिषद अर्थ समितीची सभा व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली; परंतु या सभेत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा, कृषी व ...
जिल्हा परिषद अर्थ समितीची सभा व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली; परंतु या सभेत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा, कृषी व लघुसिंचन विभाग वगळता इतर विभागाचे संबंधित अधिकारी सहभागी झाले नाहीत. यासंदर्भात समिती सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त कल्यानेे, सभेला गैरहजर राहिलेल्या जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश या सभेत देण्यात आले. जिल्हा परिषद अंतर्गत प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची थकीत पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश या सभेत देण्यात आले. पंधराव्या वित्त आयोगांतर्गत निधीच्या मुद्दयावर सभेत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती सावित्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत समिती सदस्य पुष्पा इंगळे, वर्षा वझिरे, गायत्री कांबे, विनोद देशमुख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विद्या पवार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
निधी खर्चाचा अहवाल सादर करा!
जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांना प्राप्त निधीतून मार्च अखेरपर्यंत खर्च झालेल्या निधीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश या सभेत जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाला देण्यात आले.