वार्षिक परीक्षेदरम्यानच शैक्षणिक प्रगती चाचणी!
By admin | Published: April 6, 2016 01:49 AM2016-04-06T01:49:24+5:302016-04-06T01:49:24+5:30
अकोला जिल्ह्यातील २२ हजारांवर विद्यार्थी देणार चाचणी परीक्षा, चाचणी ठरणार मूल्यमापन.
अकोला: प्राथमिक शाळांमधील वार्षिक परीक्षेदरम्यानच शिक्षण विभागाने पायाभूत शैक्षणिक चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये वार्षिक परीक्षा सुरू आहेत. त्यात शैक्षणिक प्रगती चाचणी परीक्षेची भर पडल्याने, शाळांना त्यांनी केलेले नियोजन बदलावे लागत आहे. काही शाळांमध्ये तर वार्षिक परीक्षासुद्धा आटोपण्याच्या मार्गावर आहेत. सुट्यांच्या तोंडावर शिक्षण विभागाकडून शैक्षणिक प्रगती चाचणी परीक्षा येऊन ठेपल्याने लहानग्या विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यात २२ हजारांवर विद्यार्थी ही चाचणी परीक्षा देत आहेत.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान अंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता तपासणीसाठी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अनिवार्य आहे. ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेतील मूल्यमापनाबाबत काय झाले, ते अद्याप बाहेर आलेले नसताना संकलित-२ ही चाचणी परीक्षा घेतली जात आहे. विशेष म्हणजे, सध्या वार्षिक परीक्षा सुरू आहेत. अवघ्या काही दिवसांमध्येच विद्यार्थ्यांना सुट्याही लागणार आहेत. असे असताना मध्येच ५ व ६ एप्रिल रोजी ही परीक्षा घेतली जात आहे. वार्षिक परीक्षा संपल्यानंतरही ही चाचणी परीक्षा घेता आली असती, असा सूर पालकांकडून व्यक्त होत आहे. सध्या विद्यार्थी वार्षिक परीक्षेच्या मानसिकतेत असताना, ही परीक्षा घेतली जात असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ९१५ प्राथमिक शाळांसोबतच अनुदानित, विनाअनुदानित, खासगी प्राथमिक शाळांमध्ये ही चाचणी परीक्षा होत आहे.