शैक्षणिक सत्र संपले ; विद्यार्थ्यांना मिळाला नाही 'स्वाधार' चा आधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 10:25 AM2020-06-05T10:25:16+5:302020-06-05T10:25:29+5:30
पात्र १ हजार ५०० विद्यार्थ्यांना निवास, भोजन व शैक्षणिक साहित्याच्या खर्चाची रक्कम अद्याप मिळाली नाही.
- संतोष येलकर
अकोला : गतवर्षीचे शैक्षणिक सत्र संपले असून, यावर्षीचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असताना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर 'स्वाधार ' योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र १ हजार ५०० विद्यार्थ्यांना निवास, भोजन व शैक्षणिक साहित्याच्या खर्चाची रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यामुळे योजनेच्या लाभापासून वंचित जिल्ह्यातील विध्यार्थ्यांना 'स्वाधार ' चा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
इयत्ता दहावीनंतर पुढील शिक्षण जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी घेणाऱ्या अनुसूचित जातीमधील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर आधार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना निवास, भोजन व शैक्षणिक साहित्य खर्च भागविण्यासाठी दरवर्षी पात्र विध्यार्थ्याच्या बँक खात्यात प्रत्येकी ४३ हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात येते . या योजनेंतर्गत २०१९-२० यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील अनुसूचित जातीमधील पात्र ठरलेल्या १ हजार ५०० विद्यार्थ्यांना अद्याप निवास, भोजन व शैक्षणिक साहित्याच्या खर्चाची रक्कम मिळाली नाही. गतवर्षीचे शैक्षणिक सत्र संपले असून, यावर्षीचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असताना, शासनाकडून निधी उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील १ हजार ५०० विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यानुषंगाने शासनाकडून निधी केव्हा प्राप्त होणार आणि स्वाधार योजनेंतर्गत निवास, भोजन व शैक्षणिक साहित्याच्या खर्चाची रक्कम बँक खात्यात केव्हा जमा होणार, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातील पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र १ हजार ५०० विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात निवास, भोजन व शैक्षणिक साहित्याच्या खर्चाची रक्कम जमा करण्यासाठी ८ कोटी रुपये निधीची मागणी शासनाच्या समाज कल्याण विभागाकडे करण्यात आली आहे.
-अमोल यावलीकर
सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, अकोला.
शासनाकडून केव्हा मिळणार निधी?
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात निवास,भोजन व शैक्षणिक साहित्याची रक्कम जमा करण्यासाठी ८ कोटी रुपयांचा निधी शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून अध्याप उपलब्ध झाला नाही. त्यामुळे हा निधी शासनाकडून केव्हा मिळणार, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.