माजी महापौरांच्या कौलखेडातील घरासह हॉटेलची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 02:18 PM2019-10-23T14:18:23+5:302019-10-23T14:18:28+5:30
अमरावती व अकोला एसीबीने त्यांच्या घरांची व हॉटेलची मंगळवारी पहाटेपर्यंत झाडाझडती घेतली.
अकोला: शहरातील भाजपाच्या पहिल्या महापौर सुमन गावंडे व पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालेले सहायक पोलीस निरीक्षक त्यांचे पती श्रीराम गावंडेसह त्यांच्या तीन मुलांविरुद्ध अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) रविवारी रात्री उशिरा बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर अमरावती व अकोला एसीबीने त्यांच्या घरांची व हॉटेलची मंगळवारी पहाटेपर्यंत झाडाझडती घेतली. या दरम्यान अधिकाऱ्यांनी त्यांच्या संपत्तीच्या नोंदी घेऊन पंचनामे केले. गावंडे कुटुंबीयांकडे १ कोटी ५२ लाख २२ हजार ८९४ रुपयांची मालमत्ता बेहिशेबी असल्याचे एसीबीने केलेल्या तपासात समोर आले आहे.
सरकार पक्षातर्फे बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची फिर्याद अमरावती एसीबीचे पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे यांनी दिली आहे. त्यानुसार एसीबीने श्रीराम कजदन गावंडे यांच्या कुटुंबातील त्यांच्या पत्नी माजी महापौर सुमन श्रीराम गावंडे, मुलगा प्रवीण श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, विक्रम श्रीराम गावंडे यांच्याविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास अकोला एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शरद मेमाने यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारपासून श्रीराम गावंडे यांच्या कौलखेड परिसरातील प्रमोद नगर येथील घराची झडती पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे यांनी घेतली. त्यांनी घरातील सामान आणि इतर आवश्यक बाबींच्या नोंदी घेऊन पंचनामे केले. तर अकोला एसीबीचे पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण यांनी श्रीराम गावंडे यांचे पोलीस खात्यात असलेले भाऊ श्रीकृष्ण गावंडे यांच्या घराची झडती घेतली. तसेच श्रीराम गावंडे यांच्या मुलाचे बार्शीटाकळी रोडवरील नंदनवन हॉटेलची तपासणी करून पंचनामा केला. आरोपी श्रीराम गावंडे व त्याची मुले सध्या किसनराव हुंडीवाले यांच्या हत्याकांड प्रकरणात कारागृहात आहेत. तर एक मुलगा अद्यापही फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.