शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना एसीबीची नोटीस, राजकीय वर्तुळात खळबळ
By आशीष गावंडे | Published: January 9, 2023 07:06 PM2023-01-09T19:06:14+5:302023-01-09T19:08:22+5:30
Nitin Deshmukh : येत्या १७ जानेवारी रोजी संपत्तीच्या उघड चौकशीसाठी अमरावती येथील एसीबी कार्यालयात उपस्थित राहण्याचे नोटीस मध्ये नमूद करण्यात आले आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस जारी केली आहे. येत्या १७ जानेवारी रोजी संपत्तीच्या उघड चौकशीसाठी अमरावती येथील एसीबी कार्यालयात उपस्थित राहण्याचे नोटीस मध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या नोटीसमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राज्यात शिवसेनेचे दोन गट निर्माण झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटातील आमदारांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत गुवाहाटी येथे गेलेले सेनेचे जिल्हाप्रमुख तथा बाळापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख उद्धव ठाकरे गटात माघारी फिरले होते. दरम्यान, आ. देशमुख यांच्याकडे चल,अचल संपत्ती असल्याच्या संदर्भानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना नोटीस जारी केली आहे. यामध्ये संपत्तीची चौकशी करण्याच्या अनुषंगाने १७ जानेवारी रोजी अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे अप्पर पोलीस अधिक्षक अरुण सावंत यांनी सूचित केले आहे. आ.देशमुख यांना नोटीस मिळाल्याचे उघड होताच जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला पेव फुटले आहे.
मतदार संघात केली चौकशी
आ.नितीन देशमुख यांच्याकडे किती संपत्ती आहे, यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी बाळापूर मतदार संघातील काही गावांमध्ये चौकशी केली होती. त्यानंतर आ.देशमुख यांना संबंधित विभागातून भ्रमणध्वनीद्वारे विचारणा झाली होती.
माझ्यासह उद्धव ठाकरे गटातील आणखी दोन आमदारांना एसीबीने नोटीस जारी केली आहे. पोलिसांवर दबावतंत्राचा वापर करुन मला नाहक खोट्या प्रकरणांत गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिंदे गटात समावेश न केल्याचे हे परिणाम आहेत.
- नितीन देशमुख आमदार तथा जिल्हाप्रमुख शिवसेना, ठाकरे गट