ठाकरे गटाच्या आमदाराला ‘लाचलुचपत’ची नोटीस; १७ राेजी अमरावतीत होणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 07:33 AM2023-01-10T07:33:24+5:302023-01-10T07:33:33+5:30
एकनाथ शिंदे यांच्या समवेत गुवाहाटी येथे गेलेले आमदार नितीन देशमुख उद्धव ठाकरे गटात माघारी फिरले हाेते.
अकोला : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस जारी केली आहे. येत्या १७ जानेवारी रोजी संपत्तीच्या उघड चौकशीसाठी अमरावती येथील एसीबी कार्यालयात उपस्थित राहण्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. आ. देशमुख यांना नाेटीस मिळाल्याचे उघड हाेताच, जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला पेव फुटले आहे. एकनाथ शिंदे यांच्या समवेत गुवाहाटी येथे गेलेले आमदार नितीन देशमुख उद्धव ठाकरे गटात माघारी फिरले हाेते.
माझ्यासह उद्धव ठाकरे गटातील आणखी दाेन आमदारांना एसीबीने नाेटीस जारी केली आहे. मला नाहक खाेट्या प्रकरणांत गाेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिंदे गटात समावेश न केल्याचे हे परिणाम आहेत.
- नितीन देशमुख, आमदार तथा जिल्हाप्रमुख शिवसेना, ठाकरे गट
मतदारसंघात चाैकशी
आ. नितीन देशमुख यांच्याकडे किती संपत्ती आहे, या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी बाळापूर मतदारसंघातील काही गावांमध्ये समक्ष भेट देऊन चाैकशी केली हाेती.