जिल्ह्यात शेती अवजारे दुरुस्तीच्या कामास वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:16 AM2021-06-02T04:16:06+5:302021-06-02T04:16:06+5:30
अकोला : जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. सद्य:स्थितीत शेतकरी पेरणीपूर्व कामात व्यस्त असून, आतापासूनच ...
अकोला : जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. सद्य:स्थितीत शेतकरी पेरणीपूर्व कामात व्यस्त असून, आतापासूनच कृषी अवजारे दुरुस्त करून ठेवली जात आहेत. आर्थिक अडचणीत असतानाही शेतकरी खरीप हंगामासाठी पैशांची जुळवाजुळव करीत असल्याचे चित्र आहे.
मृग नक्षत्र जवळ आल्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व कामांच्या तयारीला लागला आहे. पेरणीवेळी धावपळ होऊ नये यासाठी शेती अवजारेही दुरुस्त करून ठेवली जात आहेत. लोखंडी वखर, कोळपे, लोखंडी पेरणी यंत्राची चाके आदी साहित्याची दुरुस्ती सुरू आहे.
यासाठी गावात कारागीर आले असून सकाळपासून सायंकाळपर्यंत शेती अवजारे दुरुस्तीचे काम केले जात आहे. कोरोनामुळे दोन महिन्यांपासून हा व्यवसाय बंद होता. मात्र, पेरणीसाठी शेती अवजारे दुरुस्ती करण्यात येत असल्यामुळे सध्या तरी दोन-तीन दिवसांपासून काम मिळत आहे.
यातून थोडासा दिलासा मिळत असल्याचे शेती अवजारे दुरुस्ती कारागिरांनी सांगितले.
------------------------------------
मशागतींचे कामे अंतिम टप्प्यात!
मान्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यात जोरदार बरसल्याने शेती मशागतींच्या कामांना वेग आला आहे. सद्य:स्थितीत मशागतीची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. दरम्यान, पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरद्वारे मशागत महागली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
------------------------------