पणज परिसरात शेती कामांना आला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:14 AM2021-07-18T04:14:52+5:302021-07-18T04:14:52+5:30
संजय गवळी पणज: अकोट तालुक्यातील ग्राम पणज परिसरात यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. ...
संजय गवळी
पणज: अकोट तालुक्यातील ग्राम पणज परिसरात यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणी केली; मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आली आहे. गत तीन ते चार दिवसांपासून परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिके बहरली आहेत. त्यामुळे परिसरात शेती कामांना वेग आला असून, बळीराजा व्यस्त आहे.
परिसरात काही भागात पाऊस न झाल्याने काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. दरवर्षी अतिवृष्टी, पावसाचा खंड, कीड-रोगांचे आक्रमण, तणांचा प्रादुर्भाव असे हल्ले सुरूच असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. हाती आलेले उत्पादन विक्रीस नेले, तर बाजारातील सर्वच घटकांकडून लूट होत असल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट कायम आहे. मागील आठवड्यात पणज परिसरात दमदार पाऊस झाल्यानंतर पणजसह बोचरा, गौरखेड, शहापूर, वाघोडा, नरसिंगपूर, धामणगाव या परिसरात शेतीकामांना वेग आला आहे. दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. (फोटो)
-------------
शेतात निंदन, डवरणीची कामे सुरू
दमदार पावसामुळे शेतात निंदन, डवरणी व फवारणीची कामे सुरू आहेत. पणज परिसर केळीसाठी प्रसिद्ध असल्याने परिसरात केळी लावायला सुरुवात झाली आहे. पणज परिसरात वन्य प्राण्यांचा हैदोस सुरूच असून, पिकांचे नुकसान होत आहे. वन्य प्राण्यांचा धुमाकूळ वाढल्याने शेतकरी पिके वाचविण्यासाठी शेतात मुक्काम करीत असल्याचे चित्र आहे. याबाबत वन विभागाने दखल घेऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.