अकोला-पूर्णा रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाला गती
By Atul.jaiswal | Published: June 27, 2020 09:40 AM2020-06-27T09:40:37+5:302020-06-27T09:42:45+5:30
अकोला ते शिवणी-शिवापूर रेल्वेस्थानकापर्यंत विद्युत खांब उभारण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा सर्वात कमी अंतराचा व महत्त्वाच्या लोहमार्गावरील अकोला ते पूर्णा या २१० किलोमीटर लांबीच्या टप्प्याच्या विद्युतीकरणाला गती मिळाली असून, अकोला ते शिवणी-शिवापूर रेल्वेस्थानकापर्यंत विद्युत खांब उभारण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. कामाची गती पाहता २०२१ पर्यंत हे काम पूर्णत्वास जाऊन या मार्गावर डिझेलऐवजी विजेवर चालणाारे रेल्वे इंजीन लवकरच धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दक्षिण-मध्य रेल्वेचा अकोला ते पूर्णा हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेजमध्ये परिवर्तित झाल्यानंतर या मार्गावरील प्रवासी व मालवाहू गाड्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे. देशभरातील लोहमार्गांचे विद्युतीकरण करण्याच्या रेल्वेच्या योजनेचा भाग म्हणून अकोला ते परभणी जिल्ह्यातील पूर्णा रेल्वेस्थानकापर्यंत विद्युतीकरण होणार आहे. या मार्गाच्या विद्युतीकरणासाठी रेल्वे मंत्रालयाने २०१८ च्या अर्थसंकल्पात २११ कोटीपेक्षा अधिक निधीची तरतूद केली होती. त्यानंतर या मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. रेल्वेच्या अलाहबादस्थित सेंट्रल आॅर्गनायझेशन फॉर रेल्वे इलेक्ट्रिफिकेशनमार्फत रेल्वे विद्युतीकरणाचे काम केले जाते. या संस्थेने निविदा प्रक्रिया राबवून ‘केईसी’ या कंपनीला विद्युतीकरणाचे कंत्राट देत कार्यारंभ आदेश दिला आहे. कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून तीन वर्षांत हे काम पूर्ण करणे बंधनकारक असल्यामुळे केईसी कंपनीने युद्धपातळीवर विद्युतीकरणाचे काम हाती घेतले आहे. सदर कंपनीने देशात बऱ्याच ठिकाणी निश्चित कालावधीपेक्षा कमी वेळेत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करून दाखविले आहे. गत काही आठवड्यांपासून अकोला ते पूर्णादरम्यान विविध रेल्वेस्थानकांवर विद्युतीकरणाशी संबंधित साहित्य आणून ठेवले जात आहे. एवढेच नव्हे, तर अकोला ते शिवणी-शिवापूरदरम्यान अनेक ठिकाणी विद्युत खांब उभे झाले आहेत. लॉकडाऊनच्या तीन महिन्यांच्या कालावधीत झपाट्याने काम करण्यात आले आहे. कामाचा वेग बघू जाता वर्ष २०२१ पर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
वेळ व इंधनाची होणार बचत
दक्षिण भारतातून नांदेड-पूर्णा-अकोला मार्गे उत्तर भारतात जाणाºया प्रवासी व मालगाड्या हैदराबाद ते अकोलापर्यंत डिझेल इंजीनवर धावतात. अकोल्याहून पुढे विद्युतीकरण झालेले असल्याने अकोल्यात या गाड्यांना विजेवर चालणारे इंजीन जोडले जाते. यासाठी किमान अर्धा तास खर्ची पडतो. अकोला ते पूर्णा विद्युतीकरण झाल्यास दक्षिणेकडून येणाºया गाड्या थेट उत्तर भारतात विद्युत इंजीनवर धावतील. यामुळे डिझेलवर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्चही वाचणार आहे.