विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यासाठी अर्ज स्वीकारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:53 AM2020-12-04T04:53:08+5:302020-12-04T04:53:08+5:30
अकोला: जिल्हा परिषद उपकर योजनेंतर्गत जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते बारावीमधील विद्यार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर सायकलींचे वाटप करण्यासाठी जिल्ह्यातील ...
अकोला: जिल्हा परिषद उपकर योजनेंतर्गत जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते बारावीमधील विद्यार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर सायकलींचे वाटप करण्यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे अर्ज २१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील पंचायत समितीस्तरावर स्वीकारण्याचे निर्देश जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत गुरुवारी सभापतींनी दिले.
विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यासाठी जिल्ह्यातील पंचायत समितीस्तरावर स्वीकारण्यात आलेले अर्ज जिल्हा परिषद शिक्षण विभागाने प्राप्त करून घेण्याचे निर्देश शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी शिक्षण विभागाला दिले. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत प्राप्त प्रस्तावानुसार शाळांच्या यादीला सभेत मंजुरी देण्यात आली. तसेच अकोट पंचायत समिती अंतर्गत ठोकबर्डी येथील जिल्हा परिषद शाळेला जिल्हा परिषद सदस्य पवन बुटे व रामकुमार गव्हाणकर यांच्या समितीने प्रत्यक्ष भेट देऊन ही जिल्हा परिषद शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार ठोकबर्डी येथील शाळा सुरू करण्याच्या सूचना सभेत देण्यात आल्या. जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ काॅन्फरन्सिंगव्दारे घेण्यात आलेल्या शिक्षण समितीच्या सभेत समितीचे सदस्य रामकुमार गव्हाणकर, पवन बुटे, गणेश बोबडे, रंजना विल्हेकर, आम्रपाली खंडारे, प्रगती दांदळे, रिझवाना परवीन शेख मुख्तार, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांच्यासह संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.
७० शाळांमध्ये लावणार
कॅमेरे; निधी खर्चास मंजुरी!
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ७० शाळांमध्ये सीसी कॅमेरे लावण्यात येणार असून, त्यासाठी निधी खर्चास मंजुरी देण्यात येत असल्याचे शिक्षण समितीच्या सभेत ठरविण्यात आले.