ग्रामपंचायत स्तरावर पीक विमा स्वीकारणार!
By admin | Published: July 12, 2017 01:47 AM2017-07-12T01:47:29+5:302017-07-12T01:47:29+5:30
अकोला जिल्ह्यात २८० ग्रामपंचायतींवर सुविधा!
राजरत्न सिरसाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पंतप्रधान पीक विम्याची व्याप्ती वाढविण्यासाठी पंतप्रधान पीक विमा शेतकऱ्यांना आता ग्रामपंचायत स्तरावर काढता येणार आहे. त्यासाठीचे नियोजन केंद्र सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत करण्यात आले आहे. ग्रामपंचायत स्तरावर विमा भरण्याची सुविधा नि:शुल्क राहील. अकोला जिल्ह्यात असे ४६१ केंदे्र सुरू करण्यात येणार आहेत. आतापर्यंत २८० केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यासाठीचे प्रशिक्षण त्यांच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. राज्यातही याच पद्धतीने पीक विम्याची सोय उपलब्ध करू न दिली जाणार असल्याचे वृत्त आहे.
यावर्षी सार्वत्रिक पावसाला अद्याप सुरुवात झाली नाही. पेरण्या उलटल्या आहेत. शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरण्यांची वेळ आली आहे. या पृष्ठभूमीवर शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने यावर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यास सुरुवात केली आहे. पीक विम्याची मुदत ही ३१ जुलैपर्यंत आहे. स्वत:च्या शेतीसह कुळाने अथवा भाडेपट्ट्यावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. यावर्षीचा पीक विमा हा मुबंई येथील नॅशनल इन्शुरन्स कंपनीद्वारे काढला जाणार आहे. ज्वारीचा विम्याचा हप्ता हा प्रतिहेक्टर चोवीस हजार आहे. शेतकऱ्यांना केवळ ४८० रुपये हप्ता भरावा लागेल.
तूर या पिकासाठी प्रतिहेक्टर ३० हजारऐवजी ६०० रुपये, मुगाला प्रतिहेक्टर १८ हजारऐवजी ३६० रुपये विमा हप्ता भरावा लागेल. उडिदाचा प्रतिहेक्टर हप्ता १८ हजार रुपये आहे. शेतकऱ्यांना ३६० रुपये द्यावे लागतील. भुईमूग पिकाचा प्रतिहेक्टर ३० हजारऐवजी ६०० रुपये, सोयाबीनचा प्रतिहेक्टर हप्ता ४० हजार रुपये आहे. शेतकऱ्यांना ८०० रुपये हप्ता भरावा लागणार आहे. कापसाला ४० हजार रुपये हप्ता आहे. शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हप्ता भरावा लागेल. तिळासाठीचा हप्ता २२ हजार रुपये आहे. शेतकऱ्यांना ४४० रुपये प्रतिहेक्टर भरावे लागतील.
कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा अनिवार्य
बँक कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढणे अनिवार्य आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा प्रस्ताव बँकेत सादर करताना आपले फोटो असलेले बँक पासबुक, आधार कार्डची सत्यप्रत अथवा आधार क्र मांक नोंदणी पावती सोबत न्यावी. मतदान ओळखपत्र, नरेगा जॉब कार्ड किंवा वाहनचालक परवाना चालेल. कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या बँकेच्या कर्जखात्याशी आधार कार्ड क्रमांक जोडण्यासाठी त्वरित संपर्क साधावा.
पंतप्रधान पीक विमा ग्रामपंचायत स्तरावर स्वीकारण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यात ५४१ सामान्य सेवा केंद्र (कॉमन सर्व्हिस सेंटर) उघडण्यात येणार आहेत. आतापर्यंत २८० केंद्रे उघडण्यात आली आहेत.
प्रवीण वानखडे,जिल्हा व्यवस्थापक,
कॉमन सर्व्हिस सेंटर (पीएसीएसपीव्ही, केंद्र सरकार) अकोला.
यावर्षी नॅशनल इन्शुरन्स कंपनी पीक विमा स्वीकारत आहे. त्यासाठीची सर्व उपाययोजना करण्यात आली आहे.
श्याम चिमुरकर,सहायक प्रबंधक,
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमी, अकोला.