शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा; अन्यथा मंत्र्यांचे कपडे फाडो आंदोलन! - रविकांत तुपकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 05:59 PM2020-10-30T17:59:42+5:302020-10-30T18:00:24+5:30
अकोला : पीक नुकसान भरपाइची हेक्टरी २५ रुपये मदतीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या ५ नोव्हेंबरपर्यंत मान्य करण्यात याव्या अन्यथा राज्यातील ...
अकोला: पीक नुकसान भरपाइची हेक्टरी २५ रुपये मदतीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या ५ नोव्हेंबरपर्यंत मान्य करण्यात याव्या अन्यथा राज्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार असून, त्यामध्ये वेळप्रसंगी मंत्र्यांचे कपडे फाडो आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शुक्रवारी येथे दिला.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अतिवृष्टी व पुरामुळे विदर्भात सोयाबीन व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पीक नुकसान भरपाइपोटी सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली हेक्टरी १० हजार रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी आहे. त्यामुळे ही मदत आम्हाला मान्य नसून, शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली. सरकारकडून पैसा नसल्याचे सांगितले जाते; मात्र मंत्र्यांचे दौरे बंद झाले काय, असा सवाल करीत केंद्र आणि राज्यातील दोन्ही सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप तुपकर यांनी केला. केंद्रातील मोदी सरकारने मनाचा मोठेपणा दाखवून राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. पीक नुकसान भरपाइची हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्यात यावी, सीसीआय व मार्केटिंग फेडरेशनची खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्यात यावी, शेतकऱ्यांना पीक विम्याचा शंभर टक्के लाभ मिळावा, सोयाबीन खरेदीचे प्रती क्विंटल ६ हजार रुपये भाव स्थिर करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या, कर्जमाफीच्या लाभापासून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ तातडीने देण्यात यावा, वीज देयक माफ करण्यात यावे आदी शेतकऱ्यांच्या मागण्या ५ नोव्हेंबरपर्यंत सरकारने मान्य कराव्या अन्यथा स्वभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यात केंद्रातील मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये वेळप्रसंगी मंत्र्यांचे कपडे फाडो आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. केंद्रीय मंत्र्यांसोबतच पीक नुकसानाचा चुकीचा अहवाल शासनाकडे पाठविणाऱ्या अधिकाऱ्यांचेही कपडो फाडो आंदोलन करण्यात येणार आहे, असेही तुपकर यांनी स्पष्ट केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष दामुअण्णा इंगोले, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात नेत्यांनी पाहणी करून केले ‘फोटेसेशन’!
मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील पीक नुकसानाची नेत्यांनी पाहणी करून ‘फोटोसेशन’ केले; परंतु या नेत्यांनी विदर्भातील पीक नुकसानाची पाहणी केली नाही. त्यामुळे विदभात शेतकरी नाहीत काय, असा सवाल तुपकर यांनी केला. अकोला जिल्हयात परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना, जिल्हा प्रशासनाने शून्य टक्के नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठविणे ही खेदजनक बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.
कृषी कायदे शेतकऱ्यांना आत्महत्यांच्या दारात उभे करणारे!
केंद्रातील मोदी सरकारने केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना आत्महत्यांच्या दारात उभे करणारे असल्याचा आरोप करीत, हमीभावापासून सरकारला दूर जायचे असून, त्यासाठी कृषी कायदे पारित करण्यात आले; परंतु शेतमालाला हमी भाव मिळाला नाही तर शेतकरी उदध्वस्त होइल, असेही तुपकर यांनी स्पष्ट केले.