सीईटी दिली तरच आरोग्यसेविकांना ‘एएनएम’ला प्रवेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 01:44 PM2019-12-03T13:44:30+5:302019-12-03T13:44:43+5:30
आरोग्य सेविकांना आगामी शैक्षणिक सत्रापासून सीईटी परीक्षेत मिळणाºया गुणवत्तेनुसार अभ्यासक्रमात प्रवेश मिळणार आहे.
- प्रवीण खेते
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ग्रामीण आणि दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णसेवा देणाऱ्या आरोग्यसेविकांना आता ‘एएनएम’नर्सिंगच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देणे बंधनकारक असणार आहे. ‘राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा’ने या संदर्भात निर्णय घेतला असून, आरोग्य सेविकांना आगामी शैक्षणिक सत्रापासून सीईटी परीक्षेत मिळणाºया गुणवत्तेनुसार अभ्यासक्रमात प्रवेश मिळणार आहे.
एएनएम अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत विद्यार्थ्यांना मेरीट लिस्टनुसार प्रवेश दिला जात होता; परंतु नवीन शैक्षणिक सत्रात सीईटी असेल, तरच विद्यार्थ्यांना एएनएम अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य सेविका म्हणून करिअर घडवू इच्छिणाºया विद्यार्थ्यांना आतापासूनच सीईटीची तयारी करावी लागणार आहे.
गत वर्षीच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी) आरोग्य सेविकांसाठी कार्यरत असलेल्या ‘आॅक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी’ या अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चालू शैक्षणिक सत्रामध्ये मेरीट लिस्टनुसार विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात आला; मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात एएनएमच्या १८ हजार जागा
प्राप्त माहितीनुसार, राज्यात जवळपास ४९३ महाविद्यालयात ‘एएनएम’चा ‘आॅक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी’ हा अभ्यासक्रम शिकविण्यात येतो. या महाविद्यालयांमध्ये १८ हजार जागा असून, प्रवेशासाठी नवीन शैक्षणिक सत्रापासून सीईटी देणे बंधनकारक असणार आहे.
‘एएनएम’ला व्यावसायिक दर्जा
गत वर्षी एएनएम अभ्यासक्राला व्यावसायिक दर्जा देण्यात आल्याने या अभ्यासक्रमात प्रवेशसाठी सीईटी देणे अनिवार्य करण्यात आले आहे. कुठल्याही शाखेतून बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येतो. हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांना कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेविका म्हणून नोकरीची संधी उपलब्ध आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एएनएम अभ्यासक्रमासाठी सीईटी आवश्यक असल्याचा निर्णय गत वर्षी घेण्यात आला होता. त्यानुसार, नवीन शैक्षणिक सत्रापासून त्याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती आहे; मात्र या संदर्भात आधिकारिक स्वरूपात सूचना आलेली नाही.
- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला