नवस फेडण्यासाठी जाताना मुलाचा अपघाती मृत्यू
By admin | Published: December 2, 2015 02:44 AM2015-12-02T02:44:07+5:302015-12-02T02:44:07+5:30
रूग्णवाहिकेने दिली धडक, चार वर्षीय ओमचा मृत्यू.
वाशिम : मुलगा व्हावा म्हणून नवस केला. देव नवसाला पावलाही; पण नवस फेडण्यासाठी बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे जाताना रूग्णवाहिकेने धडक दिल्याने या एकुलत्या एक साडेचार वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना वाशिम शहरानजीक असलेल्या जागमाथा चौकाजवळ मंगळवारी सकाळी ८.३0 वाजताच्या सुमारास घडली. रिसोड तालुक्यातील जवळा येथील शंकर चव्हाण व त्यांचे कुटुंब मुलाचा नवस फेडण्यासाठी १ डिसेंबर रोजी सकाळी पोहरादेवी येथे व्हॅनने जात होते. वाशिम शहरालगत असलेल्या जागमाथा चौकाजवळ त्यांचा साडेचार वर्षीय मुलगा ओम याला लघुशंका आली. ओम लघुशंका आटोपून रस्ता ओलांडत असताना भरधाव रूग्णवाहीकेने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये ओमचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याचे कुटुंबिय त्यावेळी वाहनात बसले होते. त्यांच्या समक्ष ही घटना घडली. पोहरादेवी येथे नवस फेडण्याआधीच ही घटना घडल्यामुळे चव्हाण कुटुंबावर दु:खाचे संकट कोसळले. शंकर चव्हाण यांनी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी फिर्याद नोंदविली असून, पोलीसांनी रूग्णवाहिकेचा चालक लक्ष्मण मुरलीधर चव्हाण याला अटक केली आहे.