लोंबकळत्या तारांमुळे अपघातांचा धोका
By admin | Published: March 22, 2017 02:35 AM2017-03-22T02:35:53+5:302017-03-22T02:35:53+5:30
बहुतांश व्यापारी संकुलातील विद्युत व्यवस्था अपघातास निमंत्रण देणारी.
सचिन राऊत
अकोला, दि. २१-शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या उत्सव संकुलास विद्युत व्यवस्थेतील त्रुट्या आणि शॉर्टसर्किटमुळे सोमवारी पहाटेच भीषण आग लागल्यानंतर लाखोंची हानी झाली होती. या गंभीर प्रकारानंतर मंगळवारी शहरातील व्यापारी संकुलांमधील विद्युत व्यवस्थेची पाहणी केली असता, बहुतांश व्यापारी संकुलासमोर आणि संकुलांमध्ये विद्युत तारा लोंबकळत असून, या तारा धोक्याचा इशारा देत असल्याचे ह्यलोकमतह्णने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.
शहरातील व्यापारी संकुल, हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालय तसेच मोठय़ा कार्यालयांना मनपाच्या अग्निशमन विभागाने नोटिस देऊन फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र या सर्व संबंधित संस्था आणि कार्यालयांकडून फायर ऑडिट करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे सोमवारी घडलेल्या घटनेवरून समोर आले आहे. तीन वेळा नोटिस दिल्यानंतरही उत्सव संकुलांच्या संचालकांनी फायर ऑडिट न केल्याने ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे तंत्रज्ञांचे म्हणणे आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यानंतर शहरातील गांधी रोड, टिळक रोड, जैन मंदिर परिसर, मोहंमद अली रोड, सिव्हिल लाइन रोड, कापड बाजार, भाजी बाजार आणि धान्य बाजारातील मोठय़ा व्यापारी संकुलांची, शाळा महाविद्यालय आणि हॉस्पिटलची ह्यलोकमतह्णच्या चमूने पाहणी केली असता यामधील बहुतांश ठिकाणची विद्युत व्यवस्था ही अपघातास निमंत्रण देणारी असल्याचे दिसून आले.
एवढेच नव्हे, तर प्रत्येक व्यापारी संकुलात आणि संकुलाच्या समोर विद्युत तारा या उघड्या आणि लोंबकळणार्या असल्याने अशा प्रकारच्या मोठय़ा घटनांना इशाराच देत असल्याचेही समोर आले आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करून आग, चोरी, अपघात यासारख्या घटना आपण टाळू शकतो; मात्र थोडे पैसे खर्च करण्याची मानसिकता नसल्याने या मोठय़ा घटना घडतात. घर, कार्यालयातील चोरी टाळण्यासोबतच, गॅस सिलिंडरचा स्फोट, आग रोखण्यासाठी अत्यंत कमी पैशांत उपाययोजना करण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. प्रत्येकाने या उपाययोजना करण्याची आज गरज आहे.
- राजेश धरमकर, तंत्रज्ञ