जादूटोणाविरोधी कायद्यानुसार सहा वर्षांमध्ये तब्बल १४ गुन्हे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:59 AM2019-08-20T11:59:45+5:302019-08-20T12:02:49+5:30
सहा वर्षांमध्ये जादूटोणाविरोधी कायद्यानुसार तब्बल १४ गुन्हे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले.
अकोला: सहा वर्षांपूर्वी शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणाविरोधी कायदा पारित केला. या कायद्याविषयी जिल्ह्यात अंनिसने मोठी जनजागृतीच केली नाही तर बुवाबाजी, जादूटोणा करून जनतेला भीती दाखविणाºया आणि जादूटोण्याच्या भयातून मुक्तता करण्याचे आमिष दाखविणाºया मांत्रिक, महाराज, ज्योतिषांना गजाआड करण्यात मोलाची भूमिका बजावली. सहा वर्षांमध्ये जादूटोणाविरोधी कायद्यानुसार तब्बल १४ गुन्हे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले. त्यामुळे बºयाच अंशी अंधश्रद्धा विरोधात लढा देण्यास मदत झाली. २० आॅगस्ट २०१३ रोजी नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली होती या हत्येलाही सहा वर्ष पूर्ण होत आहे.
सुरुवातीला जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात नव्हता. त्यामुळे फसवणुकीचे गुन्हे दाखल होत असत; परंतु त्यात अनेक त्रुटी होत्या आणि सामान्य शिक्षेची तरतूद होती. आरोपी जामिनावर सुटत. त्यानंतर २0१३ साली महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी जादूटोणाविरोधी कायदा पारित केला. या कायद्यामुळे जनतेच्या मनात असलेल्या अनेक अंधश्रद्धा, जादूटोणा, भानामती, भूतपिशाचसारख्या भ्रामक कल्पना दूर करण्यासाठी मदत झाली. अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्ह्यात सातत्याने जनजागृती करून जनतेला जागरूक करण्याचे कार्यच केले नाही तर जनतेच्या मनातील अंधश्रद्धा, जादूटोणा, मंत्रतंत्राविषयीच्या भीतीचा फायदा घेऊन त्यांच्यावर अघोरी प्रयोग करून आर्थिक लुबाडणूक करणाºया मांत्रिक, महाराज, बुवाबाजी करणारे, ज्योतिषी यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्यांना गजाआड करण्यातसुद्धा यश मिळविले. एवढेच नव्हे तर राज्यातील पहिली कारावासाची शिक्षा बार्शीटाकळी तालुक्यातील मांडोली गावातील मांत्रिकाला सुनावली.
नरबळी, भूतपिशाच, गुप्तधनाविषयी गैरसमज!
ग्रामीण भागासोबत शहरी भागातसुद्धा जादूटोणा, भूत, प्रेत, नरबळी, गुप्तधन याविषयी मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहेत आणि अंधश्रद्धांना खतपाणी घालण्याचे काम मांत्रिक, महाराज, बुवा करीत आहेत. अंनिसने तर भूत जगात नाहीच, असे सांगत, रोख बक्षीस देण्याचे आवाहन केले होते. जादूटोणा, मंत्रतंत्र या सर्व भ्रामक कल्पना आहेत. त्यामुळे जनतेने मांत्रिक, बुवा, महाराजांपासून दूर राहायला हवे.
या महाराज, मांत्रिकांचा केला भांडाफोड
-शहरात एका हॉटेलमध्ये उत्तर प्रदेश येथील ओमप्रकाश जोशी नावाचा ज्योतिषी येत होता आणि वृत्तपत्रात जाहिरात देऊन ज्यांना मूलबाळ होत नाही, कोर्ट कचेरीचे काम, वशीकरण, प्रेमप्रकरण, गतिमंद आणि लकवा आदी प्रकारातून बरे करण्याचा दावा करत होता. त्याच्याविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यानुसार सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
-एका मुंज्याचा (अविवाहित तरुणाचा) बळी दिल्याने पैशांचा पाऊस पडेल यासाठी संभाजी ब्रिगेडच्या एका तरुणाला फसवणाऱ्या सुधाकर सोळंके या शिक्षकावर आणि वाशिम येथील मांत्रिकावर खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
-बाळापूर तालुक्यातील दगडखेड, बार्शीटाकळी तालुक्यातील खेट्री येथे काही घरांमध्ये भानामती करून जनतेमध्ये दहशत पसरविली होती. हा प्रकार अ.भा. अंनिसने बंद केला.
चमत्काराचा दावा करणाºया भोंदूबाबा-ज्योतिष-मांत्रिकावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. तंत्र-मंत्र, अंगात येणे, करणी, जादूटोणा सर्व थोतांड आहे. जादूटोणाविरोधी कायदा गुन्हा घडण्याअगोदरच लागू होतो. यात शिक्षा व ५0 हजार दंडाची तरतूद आहे. कोणाची फसवणूक होत असल्यास त्यांनी अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क करावा.
-चंद्रकांत झटाले,
महानगर संघटक, अ.भा. अंनिस