सात-बारा उताऱ्यावर मिळणार पिकांची अचूक माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 10:36 AM2021-08-05T10:36:50+5:302021-08-05T10:36:57+5:30
Accurate information of crops will be available on Saat-Bara : शासन स्तरावर ई-पीक पाहणी कार्यक्रम सर्व जिल्हास्तरावर राबविण्यात येणार आहे.
अकोला : राज्यामध्ये सन २०१८ पासून प्रायोगिक तत्त्वावर २० तालुक्यात ई-पीक पाहणी कार्यक्रम राबविण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी झाल्यामुळे शासन स्तरावर ई-पीक पाहणी कार्यक्रम सर्व जिल्हास्तरावर राबविण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना सात बारा उताऱ्यावर अचूक माहिती व त्यांच्या सोयीप्रमाणे उपलब्ध होणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) गजानन सुरंजे यांनी दिले.
ई-पीक पाहणी प्रकल्पाची ओळख, महत्त्व, उद्देश तसेच चालू खरीप हंगामात मोबाईल ॲपद्वारे मोजणीची पूर्व तयारी व अंमलबजावणी करण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले, महसूल सहायक अधीक्षक हर्षदा काकड, जिल्हा हेल्प डेस्कचे प्रसाद रानडे, महसूल सहायक हितेश राऊत उपस्थित होते.
२५० पिकांची नोंद होणार
सातबारा उताऱ्यामध्ये यापूर्वी गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, ऊस, कापूस, मका, सोयाबीन आदींसह २० पिकांची नोंद व्हायची. परंतु आता ई-पीक पाहणी मोबाइल ॲपद्वारे शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करत असल्याने सुमारे २५० पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर होणार आहे. यामुळे शासनाला पिकांची अचूक माहिती मिळणार आहे. तसेच गावनिहाय पिकांची आकडेवारी उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागात गावपातळीवर महसुली लेखे ठेवण्याकरिता विविध गाव, नमुने व दुय्यम नोंदवह्या विहित करण्यात आलेल्या आहेत. यामधील गाव नमुना सात हा ‘अधिकार अभिलेख’ विषयक असून गाव नमुना नंबर बारा ' पिकांची नोंदवही ' ठेवण्यासंदर्भात आहे.
शेतकरी करू शकतात फोटो अपलोड
गाव नमुना बारा मधील पिकांच्या नोंदी अद्यावतीकरणासाठी भूमी अभिलेख विभागाने मोबाइल ॲप विकसित केले आहे. आता शेतकरी प्रत्यक्ष शेतात जाऊन मोबाइल ॲपद्वारे पिकांचे फोटो अपलोड करु शकतात. या ॲपमध्ये अक्षांश व रेखांशाची नोंद होणार असल्याने त्या शेतकऱ्यांच्या शेताचे स्थानही तलाठ्याला कळणार आहे. या ॲपवर पिकांची वर्गवारी करण्यात आली असून यामध्ये १८ वर्ग करण्यात आले आहे. कडधान्ये, तृणधान्ये, पॉली हाऊस मधील पिके, भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती आदींचा समावेश आहे. तसेच या ॲपमध्ये ५८० पिकांच्या नोंदी घेता येणार आहेत.