विदेशी बनावटीच्या दोन पिस्तूलसह आरोपी गजाआड
By admin | Published: July 7, 2017 01:46 AM2017-07-07T01:46:12+5:302017-07-07T01:46:12+5:30
गुन्हे शाखेची शिवणीत कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विदेशी बनावटीच्या दोन पिस्तूल-काडतूसांसह जगदीश विश्वनाथ माने (४०) या आरोपीस गुरुवारी गजाआड करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई शिवणी परिसरात दुपारी केली. या कारवाईमुळे अकोला शहरात शस्त्र विक्रीची टोळी कार्यरत असल्याची शक्यता वर्तविली जात असून, त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.
एक इसम विदेशी बनावटीच्या पिस्तूलची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवणीच्या उड्डाणपुलाजवळ सापळा रचला. मिळालेल्या माहितीच्या वर्णनाच्या इसमाला अडवून त्यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीत त्याच्याजवळून विदेशी बनावटीच्या दोन पिस्तूल आढळल्या. सोबतच दोन जिवंत काडतूसही जप्त करण्यात आल्या.
दहा हजार रुपये किमतीच्या या मुद्देमालासह आरोपी जगदीश विश्वनाथ माने (४०) रा. कैकाडीपुरा धोबी खदान याच्यावर ३,२५ आर्मअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. माने याने आतापर्यंत किती लोकांना शहरात पिस्तूल विकल्यात आणि तो आणतो कुठून, त्याचे सहकारी किती आहेत, याचा छडा पोलिसांसाठी आव्हान ठरणार आहे. अकोल्यात शस्त्रविक्री करणारी मोठी टोळी असण्याची शक्यता यातून अधोरेखित होते; मात्र पोलिसांकडून केवळ पिस्तूल, काडतूस आणि आरोपींना पकडले जाते, त्यापलीकडे तपास जात नाही. या कारवाईचे पुढे काय होते, याकडे आता अकोलेकरांचे लक्ष लागून आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, विजयकांत सागर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक कैलास नागरे, चंद्रकांत ममताबादे यांच्या मार्गदर्शनात अशोक चाटी, शेख हसन, अ. माजिद, एजाज अहेमद यांनी केली.