विनयभंगप्रकरणी आरोपीस अकोल्यातून अटक
By admin | Published: June 12, 2016 02:47 AM2016-06-12T02:47:22+5:302016-06-12T02:47:22+5:30
व्हॉट्स अँप मोबाइलवर अश्लील फोटो शेअर करून विनयभंग केल्याचे प्रकरण.
खामगाव: येथील महिला मंडळ अधिकार्याच्या व्हॉट्स अँप मोबाइलवर अश्लील मॅसेज आणि फोटो शेअर करून विनयभंग केल्याप्रकरणी अकोला येथील ३0 वर्षीय युवकास शहर पोलिसांनी १0 जून रोजी रात्री अटक केली आहे. येथील महसूल विभागात कार्यरत असलेल्या एका महिला मंडळ अधिकार्याच्या व्हॉट्स अँप मोबाइलवर एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून इसमाने अश्लील मॅसेज आणि फोटो शेअर करून महिलेच्या लज्जेस धोका पोहचविला. याप्रकरणी सदर महिला अधिकार्याने शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. यावरून शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांनी सदर अनोळखी क्रमांकाचा शोध घेतला असता तो नंबर अकोला येथील विवेक बाबुराव इंगळे (वय ३0) रा. आनंद नगर, बाजोरिया ले-आऊट याचा असल्याचे पोलीस तपासात समोर आले. यावरून शहर पोलिसांनी त्यास १0 जून रोजी रात्री अकोला येथील राहत्या घरून अटक केली. त्याला खामगाव येथे आणण्यात आले असून त्यास ११ जून रोजी खामगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाकडून आरोपी विवेक बाबुराव इंगळे यास जामीन देण्यात आला. पुढील तपास खामगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत.