बसमधून ८० लाखांची रोकड नेणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या!
By नितिन गव्हाळे | Published: December 2, 2023 06:44 PM2023-12-02T18:44:37+5:302023-12-02T18:46:19+5:30
मुंबईला नेण्यात येत हाेती रोकड, स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कामगिरी.
नितीन गव्हाळे, अकोला: व्यापाराशी संबधित ८० लाख रूपयांची रोकड पातूर येथील ढाब्यावर उभ्या असलेल्या लक्झरी बसगाडीतून लंपास करणाऱ्या आंतरराज्यीत टोळीतील एका आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी मुसक्या आवळून ७९ लाखांची रोकड हस्तगत केली आहे. २६ नोव्हेंबर रोजी ही रात्री ही घटना घडली होती.
राजापेठ अमरावती येथील राजु वेलाजी प्रजापती(२६) यांच्या तक्रारीनुसार ते व्यापाराशी संबधित ८० लाख रूपयांची रोकड घेऊन खाजगी लक्झरी बसगाडीने अकोलामार्गे मुंबईला जात होते. दरम्यान लक्झरी बस पातुरातील क्वालिटी ढाब्याजवळ थांबली होती. राजु प्रजापती हे शौचासाठी खाली उतरले असता, अज्ञात चोरट्याने ८० लाख रूपये असलेली बॅग लंपास केली होती. या प्रकरणात पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य पाहता, पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकरराव शेळके यांच्या मार्गदर्शनात एपीआय कैलास डी. भगत, पीएसआय गोपाल जाधव यांनी गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी मध्यप्रदेश येथे रवाना होवून त्यांनी ग्राम खेखा ता मनवार जि. धार येथील आरोपी विनोद विश्राम चव्हाण(१९) रा. लुन्हेरा बुजूर्ग ता. मनावर जि.धार यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या राहते घरातुन रोखरक्कम ७९ लाख रूपये जप्त केले. त्याचा साथीदार रहेमान उर्फ पवली गफुर खान हा मात्र फरार होण्यात यशस्वी झाला.
यांनी परत आणली रोकड
पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डाेंगरे यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे कर्मचारी गणेश पांडे, राजपालसिंग ठाकुर, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, अब्दुल माजीद, विशाल मोरे, एजाज अहेमद, वसीमोद्दीन शेख, अविनाश पाचपोर, भिमराव दिपके, स्वप्नील चौधरी, राहुल गायकवाड, अन्सार शेख, मोहम्मद आमीर, लिलाधर खंडारे, खुशाल नेमाडे, अक्षय बोबडे, प्रविण कश्यप, प्रशांत कमलाकर, अनिल राठोड यांनी आरोपींचा माग काढत, ७९ लाखांची रोकड आरोपीकडून हस्तगत केली आहे.