महिलेस मारहाण करणाऱ्या आरोपीस दोन वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:40 PM2019-07-23T12:40:08+5:302019-07-23T12:40:19+5:30
मारहाण केल्याप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सोमवारी सुनावली.
अकोला: अकोट फैल परिसरातील रहिवासी शेख सत्तार शेख गफ्फार यास महिलेचा विनयभंग करणे तसेच तिला मारहाण केल्याप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सोमवारी सुनावली. यासोबतच २ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास आणखी शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.
अकोट फैलातील कादरीपुरा येथील रहिवासी शेख सत्तार शेख गफ्फार हा मजुरी काम करतो. १ फेब्रुवारी २००६ रोजी तो एका घराच्या बांधकामासाठी रेती वरच्या माळ्यावर नेत असताना त्याला सदर घरात महिला एकटीच असल्याचे दिसले. त्यामुळे शेख सत्तार शेख गफ्फार याने महिलेचा घरात घुसून विनयभंग केला; मात्र महिलेने विरोध केला असता आरोपीने तिला मारहाण केली. यामध्ये महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अकोट फैल पोलिसांनी शेख सत्तार शेख गफ्फार याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४, ३२५ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी मोरे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर आरोपीविरुद्ध आढळलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे त्याला भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ अन्वये दोन वर्षांची शिक्षा, २ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांच्या शिक्षेची तरतूद न्यायालयाने केली आहे. तर ३२५ अन्वये दोन वर्षांची शिक्षा, २ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांच्या शिक्षेची तरतूद न्यायालयाने केली आहे.