बनावट नोटा प्रकरणातील दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 10:59 AM2020-11-20T10:59:18+5:302020-11-20T11:03:05+5:30
न्यायालयाने दोन्ही आरोपींची सात दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली.
अकोला: ५०० रुपयांच्या बनावट नोटाप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी दोघांना शेगाव येथून अटक केली होती. गुरुवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ५०० रुपयांच्या बनावट नोटाप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी शेगाव येथून जावेद हुसैन शाह आणि साबिर शाह या दोघांना ताब्यात घेतले होते. दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने दोन्ही आरोपींची सात दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली. या प्रकरणातील तिसरा आरोपी सुनील गुजराल याची पोलीस कोठडी शुक्रवारी संपणार असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. ११ नोव्हेंबर रोजी, अकोट फैल परिसरातील मच्छी मार्केट परिसरात ५०० रुपयांच्या बनावट नोटा चालविणाऱ्या अबरार खान रा. नायगाव अकोटफैल याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर तपासादरम्यान अबरार खान याच्या नातेवाइकाला शेगाव तालुक्यातील जानोरी येथून शेख राजीक शेख चांद याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर प्रकरणाचे शेगाव कनेक्शन उघडकीस आले होते. आतापर्यंत या प्रकरणातील पाच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून, आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.