विनयभंग व पोस्को प्रकरणातील आरोपीस तीन वर्षांचा कारावास
By सचिन राऊत | Published: July 29, 2023 05:45 PM2023-07-29T17:45:27+5:302023-07-29T17:45:41+5:30
अकोला : सिविल लाईन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ...
अकोला : सिविल लाईन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश शयना पाटील यांच्या न्यायालयाने तीन वर्षे सश्रम करावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच तीन हजार रुपये दंड ठोठावला असून दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान केले आहे.
सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी एक अल्पवयीन मुलगी २५ सप्टेंबर २०१५ रोजी घराजवळील एका दुकानात जात असताना सिद्धार्थ नगर न्यू भीम नगर येथील रहिवासी पवन साहेबराव गवई वय २६ वर्ष याने तिचा पाठलाग करून एका अंधारलेल्या गल्लीत नेऊन तीचा विनयभंग केला होता़ या प्रकरणी मुलीने सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४, पोस्को कायद्याच्या कलम सात व आठ अन्वये गुन्हा दाखल करून तपास केला़ त्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले़
या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश शयना पाटील यांच्या न्यायालयाने पाच साक्षीदारांच्या साक्ष तपासल्यानंतर समोर आलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे आरोपी पवन गवई यास कलम ३५४ अन्वये व पोस्को कायद्याच्या कलम ७ व ८ अन्वये तीन वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ यासोबतच कलम ३५४ ड आणि ५०६ अन्वये एक वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला़ दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे़ या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने अॅड राजेश आकोटकर यांनी कामकाज पाहिले़ कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून ए एस आय फजलूर रहमान काझी व श्रीकांत गावंडे यांनी कामकाज पाहिले़