देशी कट्टे, जिवंत काडतूस जप्ती प्रकरणात पुण्यातील आरोपी जेरबंद; लॉरेन्स बिश्नोईसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबत कनेक्शन
By सचिन राऊत | Published: February 4, 2024 04:31 PM2024-02-04T16:31:12+5:302024-02-04T16:31:50+5:30
अकोट शहर पोलिसांनी अकोला नाक्याजवळील पुलाखाली दोन युवकांना संशयास्पदरित्या हालचाल करीत असताना ताब्यात घेतले होते.
अकोला : अकोट शहर पोलिसांनी १६ जानेवारी रोजी दोन युवकांकडून दोन देशी कट्टे व नऊ जिवंत काडतुस जप्त केले होते. त्यांच्या माहितीवरून तिसरा साथीदार व म्होरक्या पुण्यातील रहिवासी असलेल्या शुभम रामेश्वर लोणकर या तिसऱ्या आरोपीस पोलिसांनी ३० जानेवारी रोजी अटक केली असून त्याची चौकशी केली असता आरोपीचे लॉरेन्स बिश्नोई सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबत व त्याच्या भावासोबत ऑडिओ व व्हिडिओ असे इंटरनॅशनल कॉल झाल्याचे पोलीस तपासात समोर आल्याची माहिती पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अकोट शहर पोलिसांनी अकोला नाक्याजवळील पुलाखाली दोन युवकांना संशयास्पदरित्या हालचाल करीत असताना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून दोन देशी कट्टे जप्त करण्यात आले. त्यांची आणखी चौकशी केली असता एक खाली मॅक्झिन व नऊ जिवंत काडतुस या आरोपींकडून जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात अकोट पोलिसांनी अजय तुलाराम देठे वय २७ वर्ष रा धोबीपुरा आकोट व प्रफुल विनायक चव्हाण वय २५ वर्ष रा अडगाव या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर या आरोपींची सखोल चौकशी केली असता या देशी कट्टे व जिवंत काडतुसांचा मास्टरमाईंड तिसरा आरोपी शुभम रामेश्वर लोणकर वय २५ वर्षे रा नेवरी ता अकोट हल्ली मुक्काम भालेकर वस्ती वारजे पुणे हा असल्याचे समोर आले. त्याचा शोध घेतला असता तो मध्य प्रदेशात असल्याची माहिती मिळाली; मात्र पोलिसांना तो या ठिकाणावरून पळून गेल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर अकोट पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने त्याला पुणे येथून ३० जानेवारी रोजी अटक केली. अकोट न्यायालयासमोर त्याला हजर केले असता आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या दरम्यान पोलिसांनी तपास केला असता शुभम लोणकर यांच्या मोबाईल वरून इंटरनॅशनल गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबत इंटरनॅशनल व्हिडिओ कॉल झाल्याचे समोर आले तसेच लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई याचे सोबत ऑडिओ कॉल असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. यावरून अकोट शहरात आढळलेल्या दोन देशी कट्टे व जिवंत काडतुसांमागे मोठे गौडबंगाल असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास आकोट शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्तरीत्या करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, सहायक पोलीस अधीक्षक अनमोल मितल, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके, अकोट शहरचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे, अख्तर शेख, गोपाल जाधव, चंद्रशेखर सोळंके, विशाल हिवरे, मनीष कुलट, प्रेमानंद पंचांग, रवी सदाशिव, सागर मोरे, कपिल राठोड, अब्दुल मजीद, वसीमउद्दीन, संदीप तायडे व चालक धर्मे यांनी केली.
लॉरेन्स बिश्नोई सोबत इंटरनॅशनल कॉल
पुण्यातील वारजे परिसरातील रहिवासी असलेला शुभम लोणकर याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या मोबाईलची झडती घेतली असता शुभम लोणकर च्या मोबाईल वरून लॉरेन्स बिश्नोई सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबत इंटरनॅशनल व्हिडिओ कॉल झाल्याचे समोर आले आहे. यासोबतच लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्यासोबतही वारंवार बोलणे झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
अकोटातील आरोपीचे पुणे कनेक्शन
मूळचा अकोट तालुक्यातील नेवरी येथील रहिवासी असलेला शुभम लोणकर हा पुण्यात स्थायिक झाला आहे. मात्र त्यानंतरही आकोटात दोन देशी कट्टे व नऊ जिवंत काडतूस घेऊन त्याचे दोन साथीदार आढळल्याने पुण्यातून अकोटात नेमके कोणते षडयंत्र रचल्या जात होते याचा तपास पोलीस करीत आहे.