चुलत भावाच्या खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 01:47 AM2017-11-08T01:47:30+5:302017-11-08T01:47:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाखपुरी येथे ताले नामक युवकाची हत्या करून त्याचा मृतदेह याच शेतशिवारामध्ये टाकल्यानंतर या प्रकरणात आरोपी असलेल्या चुलत भावास जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपीस १0 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास आणखी एक वर्षाची शिक्षा न्यायालयाने आरोपीस सुनावली आहे.
अमरावती जिल्हय़ातील दर्यापूर तालुक्यातील भुजवाडा येथील रहिवासी आशिष पुरुषोत्तम ताले (२८) या युवकाची लाखपुरी शेतशिवारामधील विजेंद्र देशमुख यांच्या शेतात १६ मे २0१६ रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची माहिती मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला, तसेच पुरुषोत्तम पुंडलिकराव ताले यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करताना सदर हत्या आशिष ताले याचा चुलत भाऊ गजानन बबन ताले याने केल्याचे समोर आले. यावरून पोलिसांनी गजानन ताले याला खुनाच्या गुन्हय़ात आरोपी केले. त्यानंतर सदर प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयात दाखल केले. त्यांच्या न्यायालयाने १५ साक्षीदार तपासल्यानंतर या प्रकरणातील आरोपी गजानन बबन ताले याच्याविरुद्ध आढळलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे त्याला भारतीय दंड विधानाच्या कलम ३0२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपी गजानन ताले याला १0 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास आणखी एक वर्षाच्या शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अँड. श्याम खोटरे यांनी कामकाज पाहिले.