विनयभंग, पोस्को प्रकरणातील आरोपीस तीन वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:30 AM2021-05-05T04:30:19+5:302021-05-05T04:30:19+5:30
माना येथील रहिवासी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा याच गावातील रहिवासी अनिल भगवान सोळंके (वय २५) याने विनयभंग केला ...
माना येथील रहिवासी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा याच गावातील रहिवासी अनिल भगवान सोळंके (वय २५) याने विनयभंग केला होता. या प्रकरणाची तक्रार अल्पवयीन मुलीने माना पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी अनिल सोळके याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ अ, ३५४ ड तसेच पोस्को कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास माना पोलीस स्टेशनचे दीपक कानडे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली असता त्यांच्या न्यायालयाने आरोपी अनिल सोळंके याला ३५४ अ अन्वये तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा, तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, ३५४ ड अन्वये तीन वर्षे शिक्षा, दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली, तर पोक्सो कायद्याच्या विविध कलमांन्वये तीन वर्षांची शिक्षा, दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीला तीनही शिक्षा सोबत भोगाव्या लागणार आहेत. या प्रकरणी पैरवी अधिकारी म्हणून एएसआय प्रवीण पाटील यांनी कामकाज पाहिले. सरकार पक्षातर्फे ॲड. मंगला पांडे यांनी कामकाज पाहिले.