उमरी हत्याकांडातील आरोपी पोलीस कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 01:56 PM2018-11-25T13:56:38+5:302018-11-25T13:56:43+5:30
कांत सोनुकुले यांची हत्या करणारा आरोपी रणजित तुकाराम वाघ याची प्रकृती ठीक होताच पोलिसांनी त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अकोला : लहान उमरीतील सचिन पंत नामक इसमाच्या दारू दुकानावर कामावर असलेल्या श्रीकांत सोनुकुले यांची हत्या करणारा आरोपी रणजित तुकाराम वाघ याची प्रकृती ठीक होताच पोलिसांनी त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
श्रीकांत सोनुकुले हे लहान उमरीतील सचिन पंत यांच्या देशी दारूच्या दुकानात काम करतात. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास ते दुकानात कामाला आले. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या दुकानात रणजित तुकाराम वाघ हा गुंड प्रवृत्तीचा युवक नेहमीप्रमाणे दारू पिण्यासाठी आला. त्याने श्रीकांत सोनुकुले यांना फुकटात दारू मागितली. आधी पैसे दे म्हणताच आरोपी रणजित वाघने श्रीकांत सोनुकुले यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर आरोपी दुकानाच्या बाहेर गेला आणि काही वेळाने पुन्हा आल्यानंतर श्रीकांत यांच्या पोटात चाकूने सपासप वार केले. श्रीकांत त्याला प्रतिकार करण्यापूर्वीच रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास गंभीर जखमी असलेल्या श्रीकांत सोनुकुले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झााला. सिव्हिल लाइन पोलिसांनी आरोपी रणजित वाघ याची माहिती घेऊन त्याला तातडीने अटक केली; मात्र रक्तदाब वाढल्याने त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी त्याची प्रकृती ठीक होताच पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.