जबरी चोरीतील आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:14 AM2021-04-29T04:14:21+5:302021-04-29T04:14:21+5:30
अकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नया अंदुरा येथील एका शेतावर रखवाली करीत असलेल्या युवकाला धारदार शस्त्राच्या आधारे लुटून ...
अकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नया अंदुरा येथील एका शेतावर रखवाली करीत असलेल्या युवकाला धारदार शस्त्राच्या आधारे लुटून त्याच्याकडील मोबाईल पळविणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी जेरबंद केले. या चोरट्याची कसून चौकशी केली असता त्याने अकोला शहरासह बाळापूर, उरळ व विविध ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याचा साथीदार फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
नया अंदुरा येथील रहिवासी पवन संजय आढाव हा युवक हाता फाटा येथील रहिवासी विष्णू हरिभाऊ गवाणकर यांच्या शेतावर रखवाली करीत असताना दुचाकीवर दोन युवक त्याच्याजवळ आले. त्यानंतर शस्त्र दाखवत या युवकाकडून रोख व मोबाईल पळविला. या प्रकरणाची तक्रार उरळ पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. अशा प्रकारचे गुन्हे जिल्ह्यात घडत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला असता बाळापूर तालुक्यातील उरळ येथील रहिवासी अक्षय ऊर्फ मोहन नागोराव दारोकार (वय २५) याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता या चोरट्याने मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याचा साथीदार शुभम विनायक नागलकर, रा. बाळापूर नाका अकोला याच्या सोबतीने त्याने अनेकांचे मोबाईल पळविल्याची माहिती दिली. तसेच अकोला शहरातील डॉक्टर राम बिहाडे यांच्या राहत्या घरी चोरी केल्याची कबुली दिली. बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतही चोरी केली असून, बाळापुर व विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत या दोघांनी चोरी केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. यावरून पोलिसांनी फरार असलेल्या शुभम नागलकरचा शोध सुरू केला आहे, तर या गुन्ह्यासाठी वापरलेली एम एच ३० व्ही २५१ क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख, प्रमोद डोईफोडे, अश्विन शिरसाट, रफिक शेख, फिरोज खान, मनोज नागमोते, एजाज अहमद, संदीप ताले यांनी केली.