जातिवाचक शिवीगाळप्रकरणी आरोपीस सक्तमजुरी
By admin | Published: December 30, 2015 01:59 AM2015-12-30T01:59:23+5:302015-12-30T01:59:23+5:30
तीन हजार रुपये दंड; मूर्तिजापूर तालुक्यातील प्रकरण.
अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील किन्ही येथे महिलेचा विनयभंग करून तिला जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी धानोरा वैद्य येथील आरोपीस मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. यासोबतच तीन हजार रुपये दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास आणखी एक महिन्याचा सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील धानोरा वैद्य येथील रहिवासी हरिनारायण सरदार याने किन्ही येथे एका महिलेच्या घरात घुसून तिचा ३ मार्च २0१२ रोजी विनयभंग केला होता. महिलेने त्याच्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला जातिवाचक शिवीगाळ केली होती. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मूर्तिजापूर पोलिसांनी आरोपी हरिनारायण सरदार याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४, ४५२ व जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी कलम ३ (१),(११) अन्वये गुन्हा दाखल करून तपास केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयामध्ये दोषरोपपत्र दाखल केल्यानंतर सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये आरोपी सरदार यास तीनही गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवीत, दोन गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. आरोपी सरदार याला दोन्ही शिक्षा सोबत भोगाव्या लागणार आहेत. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अँड. आर. आर. उर्फ गिरीश देशपांडे यांनी, तर आरोपीतर्फे अँड. मोतीसिंह मोहता यांनी कामकाज पाहिले.