अँसिड हल्ल्याची धमकी; पोलिसांचे लोटांगण
By admin | Published: June 27, 2014 01:28 AM2014-06-27T01:28:01+5:302014-06-27T01:33:23+5:30
अकोला शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत अडथळा : ठाणेदारांनीच दिली एक दिवसाची मुदत.
अकोला- काश्मीर लॉजजवळील अवैध पानपट्टी तोडण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला काही युवकांनी धमकी दिल्याने गुरुवारी मोहीम थांबवावी लागली. या ठिकाणी एका युवकाने अँसिड फेकण्याची धमकी दिल्याने पोलिस अधिकार्यांनी जमावापुढे लोटांगण घातले. अतिक्रमणधारकांच्या दबावाला बळी पडत पोलिसांनी पानपट्टीधारकास दस्तऐवज सादर करण्यासाठी मुदत दिली. कायद्याचे धिंडवडे काढणारी आणि पोलिसांच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण करणारी घटना रामदासपेठचे ठाणेदार विनोद ठाकरे, सिटी कोतवालीचे अनिरुद्ध अढाव, सिव्हिल लाईन्सचे प्रकाश सावकर आणि खदानचे सी.टी. इंगळे हे चार अधिकार्यांच्या उपस्थितीत घडली, हे येथे उल्लेखनीय.
अतिक्रमण निर्मूलन पथक गुरुवारी ५ वाजताच्या सुमारास काश्मीर लॉजनजीक पोहोचले. या ठिकाणी वहिद खानच्या वेलकम पान सेंटरच्या समोर असलेले टिनाचे शेड हटविण्यास सुरुवात केली. मात्र, तेवढय़ात काही युवकांनी स्वत:च टीन हटविण्यास प्रारंभ केला. उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी जेसीबीच्या चालकाला अवैध शेड तोडण्यास सांगितले. मात्र काही युवक कारवाईला विरोध करीत शेडवरच चढले. पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यानंतर या युवकांनी स्वत:च संपूर्ण टीनशेड हटविले.
या कारवाईनंतर उपायुक्त चिंचोलीकर यांनी वेलकम पान सेंटर तोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे एका युवकाने अँसिड हल्ल्याची धमकी दिली. काहींनी तर थेट ह्यमाहोल बिघड जायेंगाह्ण अशी पोलिसांनाच धमकी दिली. पाहता-पाहता जवळपास १00 युवक तेथे जमा झाले. एरव्ही सामान्य नागरिकांवर कायद्याचा बगडा उगारणार्या पोलिस अधिकार्यांनी गुंडांसमोर लोटांगण घालत मध्यस्थी करण्यास सुरुवात केली. ठाणेदार विनोद ठाकरे व अनिरुद्ध अढाव यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांशी मोबाईल फोनवरून संपर्क साधला. वरिष्ठांशी बोलणे झाल्यानंतर ठाणेदारांनी उपायुक्त दयाराम चिंचोलीकर यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर ठाणेदारांनी पानपट्टीधारक वहिदला शुक्रवारी दस्तऐवज सादर करण्यास सांगितले. अन्यथा शनिवारी बांधकाम तोडण्यात येईल, असेही पोलिसांनी त्याला बजावले. त्यामुळे मोहीम थांबविण्यात आली.