अपघात रोखण्यासाठी अकोलेकरांनी स्वीकारावी जबाबदारी - जी. श्रीकांत
By admin | Published: January 12, 2016 01:48 AM2016-01-12T01:48:55+5:302016-01-12T01:48:55+5:30
रस्ता सुरक्षा सप्ताह; जिल्हाधिका-यांनी केले अकोलेकरांना अवाहन.
अकोला : अपघात थांबविण्याची जबाबदारी केवळ संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांनीच नाही, तर सामान्य नागरिकांनीही स्वीकारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अकोलेकरांना केले.
'रस्ता सुरक्षा काळाची गरज' हा विषयाला केंद्रस्थानी ठेवून १0 ते १६ जानेवारी या कालावधीत २७ वा रस्ता सुरक्षा सप्ताह व राज्य रस्ता सुरक्षा अभियान २0१६ राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सोमवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वढोकार यांची प्रमुख उपस्थिती होती. सामान्य नागरिक म्हणून वाहतूक नियमांचे पालन करत असताना, दुर्दैवाने नियमाचे पालन न करणार्या वाहतूक शाखेच्या एका कर्मचार्यास स्वत: मेमो दिल्याचे यावेळी जिल्हाधिकार्यांनी सांगितले. पोलीस अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, वकील यासारख्या प्रतिष्ठित नागरिकांनी स्वत: वाहतूक नियमांचे पालन करायला हवे, कारण यांच्या प्रेरणेनेच सामान्य नागरिकदेखील वाहतूक नियमांचे पालन करणार असल्याचा आशावाद यावेळी जिल्हाधिकार्यांनी व्यक्त केला. अपघातामध्ये महाराष्ट्राचे प्रथम स्थान असून, राज्यात विदर्भात सर्वाधिक अपघात होतात. यामध्ये नागपूरनंतर अकोल्याचा क्रमांक लागतो. तर, राज्यात साक्षरतेच्या बाबतीत अकोला चौथ्यास्थानी आहे. अकोल्यात साक्षरतेचे प्रमाण जास्त असूनही अपघातांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वढोकार यांनी केले. देशात ६९ हजार ८९0 अपघात झाले असून, हे अपघात केवळ सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. त्या अनुषंगाने शासनामार्फत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे प्रशिक्षण देणे, वाहन चालविताना मोबाइल फोनचा उपयोग केल्यास तीन महिने वाहन परवाने रद्द करणे, जनजागृती करणार्या पत्रकांचे वाटप करण्यात येणार असल्याचे वढोकार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सरिता पवार यांनी मानले.