दलित वस्तीच्या निधीवरून अकोला मनपाच्या प्रभारी लेखाधिकार्यांची कानउघाडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 01:49 AM2018-01-11T01:49:10+5:302018-01-11T01:51:35+5:30
मनपाचे प्रभारी लेखाधिकारी आनंद अवशालकर, प्रभारी लेखापाल अरुण पाचपोर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष आ. हरीश पिंपळे, आ. प्रकाश गजभिये यांनी दोन्ही अधिकार्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिकेच्या एकूण उत्पन्नातील पाच टक्के रक्कम दलित वस्ती घटक योजनेसाठी तसेच तीन टक्के रक्कम दिव्यांगांसाठी राखीव ठेवणे क्रमप्राप्त आहे. याची जाणीव असतानासुद्धा मनपाचे प्रभारी लेखाधिकारी आनंद अवशालकर, प्रभारी लेखापाल अरुण पाचपोर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष आ. हरीश पिंपळे, आ. प्रकाश गजभिये यांनी दोन्ही अधिकार्यांची चांगलीच कानउघाडणी केली. २00४ पासून शिक्षण विभागाने शिक्षकांच्या सरळ सेवा पदभरतीचे रोस्टर अद्ययावत न केल्याची गंभीर दखल घेत शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांची वेतनवाढ रोखण्याचे निर्देश समितीने महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांना दिले.
विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने बुधवारी सायंकाळी महापालिकेच्या मुख्य सभागृहात प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला.
मनपा प्रशासनाच्यावतीने अनुसूचित जातीच्या कर्मचार्यांची भरती, प्रवर्गानुसार राखीव असलेले आरक्षण, कर्मचार्यांची पदोन्नती व अनुशेषाबाबत माहिती समितीसमोर सादर करण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष आ. हरीश पिंपळे, प्रा. जोगेंद्र कवाडे, आ. प्रकाश गजभिये यांच्यासह उपसचिव एन.आर. थिटे, अवर सचिव आनंद राहाटे यांनी मनपाच्या प्रशासकीय अधिकार्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. दलित वस्ती घटक योजनेच्या राखीव निधीवरून समितीचे अध्यक्ष आ. हरीश पिंपळे, आ. प्रकाश गजभिये यांनी मनपाचे प्रभारी लेखाधिकारी आनंद अवशालकर तसेच प्रभारी लेखापाल अरुण पाचपोर यांना विचारणा केली असता, आमच्याकडे नुकताच या विभागाचा प्रभार आल्याचे सांगत दोन्ही अधिकार्यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून समितीचे अध्यक्ष आ. हरीश पिंपळे यांनी या निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्याचा नियम जुनाच असल्याचे सांगत मनपाच्या दोन्ही अधिकार्यांची चांगलीच कानउघाडणी केली. यावेळी समितीने विभागनिहाय अनुसूचित जाती कर्मचार्यांचा रिक्त पदांवरील अनुशेष व त्यासंदर्भातील मनपाने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. समितीच्या सदस्यांसह महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ, मुख्य लेखाधिकारी सुरेश सोळसे,नगररचनाकार विजय इखार, सहायक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी डॉ. दीपाली भोसले, जलप्रदायचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे, शहर अभियंता इक्बाल खान, कार्यकारी अभियंता अजय गुजर, प्रभारी शिक्षणाधिकारी अनिल बिडवे, क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र घनबहाद्दूर, वासुदेव वाघाडकर आदी उपस्थित होते.
१३ वर्षांपासून रोस्टर जैसे थे!
मनपाच्या शिक्षण विभागाने २00४ पासून शिक्षकांच्या सरळ सेवा पदभरतीचे रोस्टर अद्ययावतच केले नसल्याचा मुद्दा समितीने उपस्थित केला. अस्थायी नऊ कला शिक्षकांना सेवेतून कमी करण्यावरही चर्चा झाली. शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला २0१६ मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिल्याची माहिती यावेळी आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली. सरळ सेवेच्या रोस्टरवरून शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांची वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्याचे निर्देश समितीने मनपा प्रशासनाला दिले. मनपा कर्मचार्यांच्या पदोन्नतीचे रोस्टर २00७ पासून अद्ययावत नसून, पदोन्नती प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करण्याचे काम सुरू असल्याचे मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी स्पष्ट केले.
महापौरांनी केले स्वागत
अनुसूचित जाती कल्याण समितीचे मनपात आगमन झाल्यानंतर महापौर विजय अग्रवाल यांनी समिती अध्यक्ष आ. हरीश पिंपळे यांच्यासह आ. जोगेंद्र कवाडे व इतर सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
संघटनांनी दिले निवेदन
मनपा कर्मचार्यांच्या थकीत वेतनासह पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाच्या रकमेचा मुद्दा उपस्थित करत मनपातील अकोला म्युनिसिपल मजदूर युनियन, कास्ट्राइब कर्मचारी महासंघ, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस आदी संघटनांच्या पदाधिकार्यांनी अनुसूचित जाती कल्याण समितीकडे निवेदन सादर केले.