२०० आॅटोचालकांवर कारवाई
By admin | Published: July 7, 2017 01:29 AM2017-07-07T01:29:45+5:302017-07-07T01:29:45+5:30
विना परवाना धावणाऱ्या आॅटोचालकांकडून १ लाख २२ हजार दंड वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरात विना परवाना धावणाऱ्या २०० आॅटोरिक्षा चालकांवर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली. या आॅटोचालकांकडून शहर हद्दीच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी १ लाख २२ हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत चाललेल्या या कारवाईमुळे शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न झालाआहे. आता अशी कारवाई मोहीम सातत्याने सुरू ठेवावी, अशी मागणी अकोलेकरांकडून होत आहे.
अकोला शहर वाहतूक शाखेच्या निरीक्षकपदी रुजू झालेले विलास पाटील यांच्या नेतृत्वात शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पाटील यांनी आता आॅटोरिक्षा आणि मोटारसायकलच्या दस्ताऐवजांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम गुरुवारी सकाळी सुरू झाली. शहरातील विविध मार्गांवर तपासलेल्या कारवाईत एकूण २०० आॅटोरिक्षा जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या आॅटोरिक्षांना ग्रामीण परवाना असून, ते काही महिन्यांपासून सर्रास शहरात वावरत आहेत. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत होती. ही बाब पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी विना परवाना वावरणाऱ्या २०० आॅटोरिक्षांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंडात्मक स्वरूपात १ लाख २२ हजार रुपयांची रक्कम वसूल केली. सोबतच ९० मोटारसायकलींवरही कारवाई केली.गुरुवारच्या या कारवाईनंतर ग्रामीण आॅटोचालकांनी पुन्हा शहरातून गावांकडे पलायन केल्याने शहरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात दूर झाली आहे.
अकोला शहरातील परवानाधारक आॅटोरिक्षांची संख्या केवळ ८ हजार आहे; मात्र काही महिन्यांपासून ग्रामीण भागातील १५ हजार आॅटोरिक्षा शहरात विना परवाना वावरून व्यवसाय करीत आहे. नियमबाह्य वावरणाऱ्या आॅटोरिक्षांनी त्यांच्या सीमाभागात जाऊन व्यवसाय करावा. दंडात्मक कारवाईची ही मोहीम भविष्यात सुरूच राहील.
- विलास पाटील, निरीक्षक,
शहर वाहतूक शाखा, अकोला.