फिरता प्रचार करणा-या २५ वाहनांवर कारवाई
By admin | Published: February 16, 2017 10:31 PM2017-02-16T22:31:20+5:302017-02-16T22:31:20+5:30
नियमाचा भंग करणार्या शहरातील २५ वाहनांवर पोलिसांनी बुधवारी कारवाई केली.
अकोला, दि. १५-एका ठिकाणी वाहन उभे करून प्रचार करणार्या वाहनांनी शहरात फिरून लाऊडस्पीकर प्रचार केल्याप्रकरणी तसेच नियमाचा भंग करणार्या शहरातील २५ वाहनांवर पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. या कारवाईत वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे, खदानचे ठाणेदार गजानन शेळके, जुने शहरचे रियाज शेख, सिव्हिल लाइनचे अन्वर शेख, रामदासपेठचे प्रकाश सावकार, डाबकी रोडचे विनोद ठाकरे यांच्या पथकांकडून करण्यात आली.
महापालिका निवडणुकीत रिंगणात असलेल्या उमेदवारांनी प्रचारासाठी वाहन भाडेतत्त्वावर घेऊन त्यावर आपापल्या पक्षाचे व अपक्षांनी आपल्या निशाणीचे फलक लावले. यासोबतच त्यावर लाऊडस्पीकर लावून जोरदारपणे गाणे वाजविण्याचा प्रकार केला; परंतु हे गाणे वाजविताना वाहने एकाच ठिकाणी उभी करून ती वाजविणे आवश्यक होती; परंतु प्रचार वाहनांनी असे न करता थेट नियमांचा भंग करीत धावत असताना लाऊडस्पीकर सुरूच ठेवले. परिणामी, ये-जा करणार्यांना त्याचा भरपूर त्रास होत होता. यासोबतच कर्णकर्कश आवाजही अनेकांसाठी नकोसा झाला होता. नियमांचा भंग झाल्याने पोलिसांनी अशा प्रकारे फिरणार्या प्रचार वाहनांवर कारवाई केली. या कारवाईमध्ये शहरातील २५ वाहनांची पोलीस ठाण्यात नोंद घेऊन त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. यासोबतच ती वाहने जप्तही केली आहेत.