एकाच दिवशी ३१५ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 10:50 AM2020-06-14T10:50:56+5:302020-06-14T10:51:07+5:30
जिल्ह्यातील सर्वच ठाणेदार, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी शुक्रवारी दिवसभर मोहीम राबवून ३१५ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
अकोला : कोरोनाचे संकट असताना चेहऱ्याला मास्क न वापरता रस्त्यावर वाहनधारकांची संख्या वाढली आहे. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या निर्देशावरून जिल्ह्यातील सर्वच ठाणेदार, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी शुक्रवारी दिवसभर मोहीम राबवून ३१५ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
वाहतूक शाखेच्यावतीने रोज विनाकारण फिरणारे तसेच मास्क न वापरणारे आणि नियमभंग करणाºया वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे; मात्र आता जिल्ह्यातील ठाणेदार, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनीही विशेष मोहीम सुरू केली असून, या एकाच मोहिमेत ३१५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हे वाहनचालक विनाकारण फिरणारे तसेच नियमांचा भंग करीत असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान वृद्धांना त्रास होणार नाही, याची खबरदारी पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच वाहतूक शाखेच्यावतीने घेण्यात आली.
ज्यांना बाहेर निघणे खरेच महत्त्वाचे आहे, त्यांना मात्र या मोहिमेत कोणताही त्रास देण्यात आला नाही; परंतु जे वाहनचालक विनाकारण बाहेर निघाल्याचे चौकशीमध्ये समोर आले, त्यांच्यावरच दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच बी-बियाणे घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनाही त्रास होणार नाही, याची खबरदारी पोलिसांनी या मोहिमेदरम्यान घेतली. ही मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती आहे. वाहनचालकांनी महत्त्वाचे काम असेल तरच रस्त्यावर यावे, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलीस प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.